>> पुढील 3 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज; येत्या 24 तासांत काही ठिकाणी पुराची शक्यता
गेल्या 5 दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळत असून, काल रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण गोव्याला झोडपून काढले. त्यामुळे काल संपूर्ण गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे विविध तालुक्यातील नद्या व नाले दुथडी भरून वाहत असून, परिणामी राज्यातील विविध भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आगामी तीन दिवसांत राज्याच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, येत्या 24 तासांत राज्याच्या काही भागांत पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात पेडण्यापासून काणकोणपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागांतील रस्ते पाण्याखाली जाण्याची, तसेच नद्या व नाले यांना पूर येण्याच्या घटनाही घडल्या. कित्येक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी झाडे वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन लोकांची अडचण झाली.
बांबोळी येथील भुयारी मार्गावर काल पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा झाला. ग्रामीण भागातील शेती व बागायतीतही मुसळधार पावसामुळे पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. येत्या 26 जुलैपर्यंत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून, 27 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस साखळी येथे झाला असून, त्याचे प्रमाण 121.8 मिमी. एवढे होते. त्यापाठोपाठ जुने गोवे येथे 117 मिमी. पाऊस कोसळला. म्हापसा येथे 101.2 मिमी., पेडणे येथे 115.8 मिमी., पणजी येथे 65.6 मिमी., जुने गोवे येथे 117 मिमी., साखळी येथे 121.8 मिमी., काणकोण येथे 67 मिमी., दाबोळी येथे 81 मिमी., मडगाव येथे 46 मिमी., मुरगाव येथे 88.6 मिमी., तर सांगे येथे 80.6 मिमी. पावसाची नोंद झाली. चालू मोसमात आतापर्यंत सर्वांत जास्त पाऊस सांगे येथे झालेला असून तो 2343 मि. मी. एवढा आहे. त्यापाठोपाठ मोसमातील आतापर्यंतचा सर्वाधिक हा केपे मतदारसंघात झालेला असून तो 2206.4 मि.मी. एवढा आहे.
सत्तरी, पेडणे तालुक्यात जोरदार पावसामुळे शेती बागायतीत पाणी शिरले. तसेच कित्येक ठिकाणी रस्तेही पाण्याखाली आली होते. दक्षिण गोव्यातील सांगे, काणकोण, केपे, सासष्टी आदी भागांतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
पावसामुळे निरंकाल व दाभाळ या गावातून वाहणाऱ्या उणय नदीने, तसेच कोडली, दावकोण, धुलय, कुंभारवाडा, शिग्नेव्हाळ आदी भागातून वाहणाऱ्या दूधसागर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल दुसऱ्या दिवशीही पेण्यामळ-निरंकाल येथील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने निरंकाल व दाभाळ गावचा संपर्क तुटला.
हवामान खात्याचा अंदाज काय?
दि. 24 ते दि. 26 जुलैपयृऐत राज्यातील काही भागांत मुसळधार व अति मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील काही भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
नव्याने बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला
गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील लोंढा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा काही भाग काल मुसळधार पावसामुळे कोसळला. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, ती अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
पावसाने कुठे कुठे झाले नुकसान?
- सासष्टी तालुक्यात 6 ठिकाणी घरे, वाहनांवर झाडांच्या पडझडीच्या घटना घडल्या, त्यात लाखोंची हानी झाली.
- धुळेर-म्हापसा येथे कृषी कार्यालयाजवळील रस्त्यावर आंब्याचे भलेमोठे झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
- पणसे-पिसुर्ले येथील रेश्मा गावडे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले.
- जोरदार पावसाने कोरगावातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले.