राज्याला मोसमी पावसाने चार दिवस झोडपून काढल्यानंतर काल थोडी उसंत घेतली. राज्यात मागील चोवीस तासांत 3.69 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात 12 ते 15 जून या चार दिवसात सुमारे 13.43 इंच इतक्या पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत एकूण 18.88 इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने 17 आणि 18 जूनसाठी ऑरेंज अलर्ट आणि 19 ते 22 जूनसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
सलग चार दिवस पडणाऱ्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. राज्यात धारबांदोडा भागात आत्तापर्यंत सर्वाधिक 25.97 इंच पावसाची नोंद झाली. हवामान विभागाकडून यंदापासून धारबांदोडा येथील पावसाची अधिकृतपणे नोंद केली जात आहे. धारबांदोड्यानंतर फोंडा, सांगे, काणकोण येथेही जोरदार पावसाची नोंद झाली.
राज्यात चोवीस तासांत पडझडीच्या 79 घटनांची नोंद झाली. या पडझडीमुळे 6 लाख 29 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तळावली फोंडा येथे एका वाहनांवर झाड मोडून पडल्याने दीड लाख रुपये, मुळगाव येथे एका घराचे छप्पर कोसळून दुसऱ्या घरावर पडल्याने सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
चोवीस तासांत म्हापसा 4.48 इंच, पेडणे 4.34 इंच, पणजी 2.55 इंच, जुने गोवे 3.49 इंच, साखळी 4.85 इंच, फोंडा 4.52 इंच, वाळपई 5.33 इंच, धारबांदोडा 6.55 इंच, काणकोण 4.14 इंच, दाबोळी 1.32 इंच, मुरगाव 1.50 इंच, केपे 3.14 इंच आणि सांगे 3.14 इंच इतकी नोंद झाली.