राज्यात दुसर्या दिवशी स्वॅब तपासणीमध्ये घट झाली असून, गेल्या चोवीस तासांत नवीन १३८७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर आणखी ५ कोरोना बळींची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात मागील ५ दिवसात २८४ कोरोनाबाधितांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे.
सलग दुसर्या दिवशी स्वॅब तपासणीमध्ये घट झाली आहे. चोवीस तासांत नवीन ४२७३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १३८७ नमुने बाधित आढळून आले. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३२.४५ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १८ हजार ९३३ एवढी झाली आहे.
राज्यात चोवीस तासात आणखी ५ कोरोनाबाधितांचा बळी गेला असून, कोरोना बळींची एकूण संख्या ३६१५ एवढी झाली आहे. चोवीस तासांत आणखी ७१ जणांना इस्पितळांत दाखल केले असून, बर्या झालेल्या ३८ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाचीची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी २१७४ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२३ टक्के एवढे आहे.
बूस्टर डोसला कमी प्रतिसाद
राज्यात कोविड बूस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत केवळ १७.२७ टक्के लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला आहे. बूस्टर डोससाठी १ लाख २४ हजार ३६२ जण पात्र आहेत. आत्तापर्यंत २० हजार २३६ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. १५ ते १८ या वयोगटातील ५८ हजार ९१६ मुलांना लस देण्यात आली आहे. राज्यातील ७४ हजार शालेय मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.