प्रचारात अडथळे आणण्यासाठी भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर

0
4

>> कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डचा आरोप

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर विरोधकांच्या प्रचारात अडथळे आणण्यासाठी केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काल केला.

निवडणूक आयोगाची गस्ती पथके, पोलीस यंत्रणा यांच्याकडून विरोधी पक्षांच्या निवडणूक प्रचारात अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी केला.

विरोधकांना प्रचारापासून परावृत्त करण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करीत असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाहीत सर्वांना समान अधिकार आहे. मात्र, भाजप सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहे, असा आरोप कवठणकर यांनी केला.

भाजप नेते दहाहून अधिक समर्थकांसह प्रचार करीत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. विरोधकांकडून सर्व नियमांचे पालन करून प्रचार केला, तरी देखील वेगवेगळी कारणे देऊन प्रचारात अडथळा आणला जातो. कॉंग्रेस, गोवा फॉरवर्डला मिळणारा पाठिंबा पाहून भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते वैफल्यग्रस्त बनले आहे, अशी टीकाही कवठणकर यांनी केली.

विरोधी उमेदवारांच्या विरोधात बनावट तक्रारी करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. भाजपच्या दंडेलशाहीला चोख उत्तर दिले जाईल.

  • दुर्गादास कामत,
    उपाध्यक्ष, गोवा फॉरवर्ड.