Home बातम्या राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा मुबलक साठा

राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा मुबलक साठा

0

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

व्यावसायिक सिलिंडर मागणीच्या 20 टक्के देणार

राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गॅस सिलिंडरबाबतच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. गॅस ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला नियमानुसार गॅस सिलिंडर उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरगुती गॅस सिलिंडरसाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयात गर्दी करू नये. तर, व्यावसायिक गॅस ग्राहकांना त्यांच्या मागणीच्या 20 टक्के गॅस सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहेत, राज्यातील पाइपलाइन गॅस पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गॅस सिलिंडर वितरणासंबंधीच्या पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काल सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतलेल्या गॅस सिलिंडरच्या विषयावर उच्चस्तरीय बैठकीला इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियमचे राज्यातील प्रमुख, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, नागरी पुरवठा खात्याचे सचिव, नागरी पुरवठा खात्याचे संचालक व इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. व्यावसायिक गॅस ग्राहकांना दरदिवशीच्या त्यांच्या मागणीच्या 20 टक्के गॅस सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहेत. औद्योगिक आस्थापनांना तूर्त गॅस सिलिंडर उपलब्ध केले जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी
सांगितले.

राज्यातील घरगुती गॅस वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी तालुका पातळीवर नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सीतील घरगुती गॅस वितरणाबाबत दररोज माहिती गोळा केली जाणार आहे. पोलीस यंत्रणेकडून गॅस वितरणावर लक्ष ठेवले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
गॅस ग्राहकांनी नेहमीच्या पद्धतीने गॅस बुकिंग करावा. कुणीही गॅस सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊ नये. गॅस सिलिंडरचे वितरण नव्याने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट व इतर आस्थापनांना त्यांच्या मागणीच्या केवळ 20 टक्के गॅस सिलिंडरचा साठा दिला जाणार आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे औद्योगिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. गॅस सिलिंडरच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर गॅस पुरवठा सुरू केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या
खाद्यपदार्थांत कपात

राज्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट मालकांना आपल्या नेहमीच्या खाद्यपदार्थामध्ये कपात करावी लागली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये दररोज अनेक प्रकारचे पदार्थ तयार करून ग्राहकांना दिले जात होते. आता, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये निवडक पदार्थ बनविले जात आहेत.