राज्यात गतवर्षात ७२६ जणांना डेंग्यू

0
100

>> रूग्णांमध्ये दुप्पट वाढ; काणकोणात १३३ रूग्ण

राज्यात वर्ष २०१९ मध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झालेली दिसून येत आहे. आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या वर्षात ७२६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून वर्ष २०१८ मध्ये ३३५ रुग्ण आढळून आले होते. २०१९मध्ये काणकोणात सर्वाधिक १३३ डेंग्यूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले.

आरोग्य खात्याला वर्ष २०१९ मध्ये ३४१८ संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यातील ७२६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त तपासणीमध्ये स्पष्ट झाले. वर्ष २०१८ मध्ये २२१० संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यातील ३३५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. राज्यात मलेरिया रुग्णांचे प्रमाण कमी होत असताना डेंग्यूच्या रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.

काणकोणमध्ये ८६४ संशयास्पद डेग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यातील १३३ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कांदोळी येथे ११४ आणि म्हापसा येथे ७२ डेेंग्यूचीची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहे. कांदोळी येथे ३४२ आणि म्हापसा येथे ३३५ संशयास्पद डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती.

मडगावात ३७, कुठ्ठाळी ३५, शिरोडा ३५, वास्को ३३, पेडणे येथे ३० डेंग्यूचे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हळदोणा येथे २१, शिवोली येथे २२, कोलवाळ येथे २८, पर्वरी येथे २१ डेंग्यूचे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पणजी, नावेली, धारबांदोडा, केपे, लोटली, सांगे, कुडचडे, बाळ्ळी, कुठ्ठाळी, कासावली, मडकई, फोंडा, चिंबल, मये, साखळी, खोर्ली, कासारवर्णे, बेतकी, वाळपई, डिचोली या ठिकाणी सुध्दा डेंग्यूचे बांधीत रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सरकारी इस्पितळ, प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच विविध खासगी इस्पितळे, खासगी रक्त तपासणी केंद्रामध्ये १३३६ डेंग्यूचे संशयास्पद रुग्ण आढळून आले आहेत. मडगावातील विविध इस्पितळांत आणि रक्त तपासणी केंद्रात ९१४ डेंग्यूचे संशयास्पद रुग्ण आढळून आले आहे. कांदोळी भागातील ५ इस्पितळांमध्ये डेंग्यूचे ३१५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात डॉ. डुकळेमध्ये सर्वाधिक २९३ संशयास्पद रुग्णांची नोंद झाली आहे.
दोनापावल येथील मणिपाल इस्पितळामध्ये डेंग्यूचे ७१ संशयास्पद रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील विविध इस्पितळांमध्ये २७ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ओल्ड गोवा इस्पितळामध्ये ५ संशयास्पद रुग्ण आढळून आले आहेत.