राज्यात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

0
76

केरळ व कर्नाटक किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पणजी वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी काल सांगितले. हा कमी दाबाचा पट्टा आज मंगळवारी किंचित गोव्याकडे सरकणार आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

वादळ ही निव्वळ अफवा
गोव्यात मान्सून ५ अथवा ६ जूनच्या आसपास धडकणार असल्याचे ते म्हणाले. केरळ, कर्नाटक बरोबरच गोव्यातील मच्छीमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यात मकुनू वादळ येणार ही अफवा असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. गोव्याला मकुनू वादळाचा कधीही धोका नव्हता. मकुनू वादळ कर्नाटकडे यापूर्वीच सरकले असून त्याचा जोरही कमी झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.