राज्यात कोरोनाबाधितांची वाढ सुरूच

0
12

>> चोवीस तासांत ३१४५ रुग्ण

>> सक्रिय रुग्णसंख्या १८,५९७

>> शुक्रवारी १४३२ जण कोरोनामुक्त

राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा उच्चांकी नवीन ३१४५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आणखी तीन कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३९.१० टक्के एवढे आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १८ हजार ५९७ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५४६ एवढी झाली आहे.

राज्यात मागील पाच दिवसांपासून इस्पितळांमध्ये दाखल होणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असलेली दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत २५ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून बर्‍या झालेल्या १७ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.
गेल्या चोवीस तासांत नवीन ८०४३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३१४५ नमुने बाधित आढळून आले.

सक्रिय रूग्णांची संख्या वीस हजारांजवळ येऊन ठेवली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ३ हजार ९६९ एवढी झाली आहे. तसेच राज्यातील १ लाख ८१ हजार ८२६ कोरोनामुक्त झाले आहेत.

४३२ जण कोरोनामुक्त
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १४३२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.१४ टक्के एवढे खाली आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत सातत्याने घट होत आहे.

शुक्रवारी देशभरात २.६४ लाख कोरोनाचे रुग्ण

गेल्या चोवीस तासांत देशात २ लाख ६४ हजार २०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मागील २४ तासांत ३१५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये ६.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर देशात आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे ५ हजार ७५३ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा १४.७८ टक्के आहे.

देशात गुरूवारी कोरोनाचे २ लाख ४७ हजार ४१७ नवीन रुग्ण आढळून आले होते. काल त्यामध्ये १६ हजार ७८५ रुग्णांची वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही १२ लाख ७२ हजार ७३ एवढी आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ८५ हजार ३५० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत ३ कोटी ४८ लाख २४ हजार ७०६ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. काल दिवसभरात १ लाख ९ हजार ३४५ लोक कोरोनातून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

१५५ कोटी लशींचे डोस
सध्या देशात लसीकरण वेगाने सुरू असून आत्तापर्यंत देशात १५५ कोटींहून अधिक लशींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात ७३ लाख ८ हजार ६६९ लशींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण १५५ कोटी ३९ लाख ८१ हजार ८१९ लसींचे डोस देण्यात आले आहेत. ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.

ओमिक्रॉनचे ५ हजारांवर रुग्ण
देशात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे ५ हजार ७५३ रुग्ण आढळून आले आहेत. देशातील जवळपास २७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, तर त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये आहेत.