राज्यात कोरोनाचे सामाजिक संक्रमण

0
201

>> मुख्यमंत्र्यांची कबुली : एकूण रुग्ण हजार पार

राज्यात कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव झाल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. राज्यातील सर्वच तालुक्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना फैलावाचे मूळ मांगूर हिल आहे. कोरोना पॉझिटिव्ह एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला कोरोनाची बाधा होऊ लागली आहे.

मास्क, सॅनिटायझर्स, सामाजिक अंतर राखण्याची नितांत गरज आहे. मार्केटमध्ये सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांची कडक अमलबजावणी करण्याची सूचना पोलीस अधिकार्‍यांना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्या परिसरातील लोकांच्या कोविड चाचण्या केल्या जात आहेत. राज्यातील विविध तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू पोहोचलेला असल्याने प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य आणि पोलीस यंत्रणेला योग्य सहकार्य देण्याची गरज आहे, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, एसओपीमध्ये बदल करण्याचा तूर्त विचार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.
राज्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची कोविड चाचणी केली जात आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येणार्‍या भागातील लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात आत्तापर्यंत ५८ हजार ५८४ जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. होम क्वारंटाइन करण्यात येणार्‍या व्यक्तींवर देखरेख ठेवली जात आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मागील काही दिवसांत बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, आणखी ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पोलीस चौकीवरील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्याला उपचारार्थ शिरोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आला आहे. या पोलीस चौकीवरील इतर पोलिसांची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुरगाव पालिकेतील आणखी दोन नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पालिकेच्या नगराध्यक्ष आणि एका नगरसेविकेला कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. या नगरपालिकेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.

नास्नोळा येथे नवीन १ कोरोना पॉझिटिव्ह आयसोलेटेड रुग्ण आढळून आला आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. आंबावली येथे आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली आहे. न्यू वाडे येथे आणखी ४ रुग्ण आढळून आले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ झाली आहे. साळ, डिचोली येथे आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. गंगानगर, म्हापसा येथे आणखी चार रुग्ण आढळून आले आहेत. काणकोण येथे आणखी एक रुग्ण आढळून आला. परराज्यातून आलेले ४ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित १३ रुग्णांना दाखल करण्यात आले असून या वॉर्डात एकूण १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात नवे ४४ पॉझिटिव्ह रुग्ण
राज्यात नवीन ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्णांच्या संख्येने हजाराचा टप्पा पार केला आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६७ एवढी झाली आहे.

कोविड महामारीच्या काळात राज्यासाठी दिलासादायक निर्णय : मुख्यमंत्री
कोविड महामारीच्या काळात राज्यातील उद्योग, व्यावसायिक आणि नागरिकांना आर्थिक व इतर बाबतीत दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील बांधकाम परवान्यांची नूतनीकरणाची मुदत ३१ ऑक्टोबर २०२० पर्यत वाढविण्यात आली आहे. नगरनियोजन खात्याच्या परवान्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

वाहतूक खात्याच्या विविध परवान्यांच्या नूतनीकरणाच्या मुदतीमध्ये ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढ करण्यात आली आहे. अबकारी खात्याच्या परवान्याच्या नूतनीकरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. परवाना नूतनीकरणासाठी दंड आकारला जाणार नाही. उद्योग खात्यातील वार्षिक लीज शुल्काचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.