राज्यात इंधनाचा तुटवडा नाही : मुख्यमंत्री

0
31

>> इंधन गळतीचे ठिकाण शोधण्यात यश

चिखली-वास्को येथील इंधन गळतीच्या प्रकरणावर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत. तसेच इंधन गळती प्रकरणाची चौकशी सुरू आहे. इंधन गळती होत असली, तरी गोव्यात सध्याच्या घडीला इंधनाचा तुटवडा नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. चिखली-वास्को येथील इंधन गळतीचे ठिकाण शोधून काढण्यात यश प्राप्त झाले आहे, असा दावाही त्यांनी केला.

दाबोळी मतदारसंघातील व्हडलेभाट-चिखली (माटवे) येथील अंदाजे सहा विहिरींतील पाण्याला चक्क पेट्रोलचा वास येत असल्याचा प्रकार 27 नोव्हेंबरला उघडकीस आला होता. 6 पैकी एका विहिरीत पूर्णपणे पेट्रोलचा साठा जमला होता. या घटनेला जवळपास 10-12 दिवस उलटले तरी इंधन गळती कुठून होत आहे त्याचा शोध घेता आलेला नाही.
या विषयी काल मुख्यमंत्र्यांना विचारले असता, त्यांनी इंधन गळतीचे ठिकाण शोधून काढण्यात यश प्राप्त झाले असल्याची माहिती दिली. तसेच या गळती प्रकरणी संबंधित पेट्रोलियम कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रथमदर्शनी अहवालानुसार ही गळती नैसर्गिक असल्याचे दिसत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

इंधन गळतीमुळे पुरवठ्यात अडथळे; पण टंचाई नाहीच

>> राज्यातील इंधन विक्रेत्यांची माहिती; महाराष्ट्र आणि कर्नाटक डेपोमधील टँकर सेवेत दाखल

व्हडलेभाट-चिखली, दाबोळी येथील इंधन गळतीमुळे राज्याच्या विविध भागांत इंधन पुरवठ्यात अडथळे आल्याचे इंधन विक्रेत्यांनी मान्य केले आहे; परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटक या ठिकाणच्या डेपोमधील टँकर सेवेत दाखल झाल्याने अद्याप इंधनाची कोणतीही कमतरता किंवा तुटवडा जाणवला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अखिल गोवा पेट्रोल पंप मालक असोसिएशनचे माजी अध्यक्ष परेश जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, इंधन पुरवठा साखळीमध्ये काही क्षणिक अडथळे आले असतील; परंतु राज्यात इंधनाची कमतरता नाही. त्यामुळे वाहनधारकांना घाबरण्याची अजिबात गरज नाही.
तेल कंपन्यांनी मिरज, देसूर आणि इतर डेपोतून टँकर आणले आहेत. सध्याच्या घडीला वितरण व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला आहे; परंतु इंधनाची कमतरता नाही. पूर्वी आम्हाला सारकवाळ डेपोतून ताबडतोब आमच्या गरजेच्या वेळी इंधनसाठा मिळायचा; परंतु आता टँकर बेळगाव आणि आसपासच्या भागातून येतात आणि यासाठी सुमारे चार तास लागतात आणि त्यामुळे इंधन पुरवठ्यात थोडा विलंब होत आहे, असेही परेश जोशी म्हणाले.

झुआरी ऑयल टँकिंग लिमिटेड इंधनवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कितीही वेळ लागला, तरी गोव्यात त्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट वितरण व्यवस्था आहे, असे तेल कंपन्यांकडून सरकारने लेखी स्वरूपात घेतले आहे. त्यामुळे गोव्यात इंधनाचा तुटवडा होणार नाही, असा विश्वास जोशींनी व्यक्त केला.

राज्य सरकारने घेतली बैठक
गोव्याच्या इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने तेल कंपन्या आणि पेट्रोल पंप डीलर्ससोबत अनेक बैठका घेतल्या आहे. राज्य सरकारने हा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतला आहे आणि बुधवारी आमची संयुक्त बैठक झाली आणि तेल कंपन्यांना त्याच दिवशी सर्व व्यवस्थांचे अहवाल देण्यास सांगण्यात आले, अशी माहिती देखील परेश जोशींनी दिली.