राज्यात आज मतदान

0
11

>> दोन्ही जागांवर प्रत्येकी 8 उमेदवार रिंगणात

>> 11 लाख 75 हजार मतदार बजावणार हक्क

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील विविध जागांबरोबरच आज (मंगळवार, दि. 7) गोव्यातील दोन जागांसाठी मतदान होणार आहे. गोव्यात लोकसभेचे उत्तर गोवा व दक्षिण गोवा हे दोन मतदारसंघ असून, तेथे प्रत्येकी 8 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी आज एकूण 11 लाख 75 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यभरातील 1725 मतदान केंद्रावरून आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रांसह केंद्रांकडे प्रयाण केले.

उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे श्रीपाद नाईक, काँग्रेसचे रमाकांत खलप, आरजीपीचे मनोज उर्फ तुकाराम परब यांच्याबरोबरच बहुजन समाज पक्षाच्या मीलन वायंगणकर, अखिल भारतीय परिवार पक्षाचे सखाराम नाईक, तसेच अन्य तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पल्लवी धेंपो, काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस, आरजीपीचे रूबर्ट पेरेरा, बहुजन समाज पक्षाच्या डॉ. श्वेता गावकर, भ्रष्टाचार निर्मूलन पक्षाचे हरिश्चंद्र नाईक व अन्य तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघांत मिळून 13 पुरुष आणि 3 महिला उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघांत खरी लढत ही भाजप व काँग्रेस पक्षात आहे. सध्याच्या घडीला दोन मतदारसंघांपैकी उत्तर गोवा मतदारसंघ हा भाजपकडे, तर दक्षिण गोवा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.

राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल, त्यांना विविध 12 ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र दाखवता येईल. मतदारांना मतदान करताना मोबाईल फोन, कॅमेरा व अन्य प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू केंद्राच्या आत नेता येणार नाहीत, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

यंदा मतदारांसाठी पिण्याचे पाणी, सरबत, शितपेये आदींची सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सोय करण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी रॅम्प वे आणि व्हिलचेअरची सोय करण्यात आलेली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना आज भरपगारी सुट्टी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर केलेली आहे. तसेच खासगी आस्थापनांतील कर्मचारी, उदाहरणार्थ औद्योगिक कामगार, तसेच राज्य सरकारी खात्यातील रोजंगारीवरील कर्मचारी, तसेच औद्योगिक क्षेत्रातील खास कामगार, सर्व खासगी आस्थापनांतील कर्मचारी, तसेच कुठलाही उद्योगधंदा, व्यापार आदीमध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार अशा सर्वांनाच ही सुटी मिळणार असल्याचे सरकारने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.