राज्यात अखेर मान्सूनचे आगमन

0
10

केरळनंतर अवघ्या तीन दिवसांत गोव्यात

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

केरळ राज्यात आठ दिवस विलंबाने दाखल झालेल्या मान्सूनने केरळनंतर मात्र अवघ्या तीन दिवसांत गोव्यात दाखल होऊन गोमंतकीयांना सुखद धक्का दिला. यंदा मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला. तेथून केवळ दोन दिवसांत कर्नाटक राज्यात प्रवेश करीत कारवारपर्यंत धडक दिली. केरळ राज्यात प्रवेश झाल्यानंतर मान्सून अंदाजे सहा दिवसांत गोव्यात धडक देत असतो. मात्र, यंदा केरळनंतर मान्सूनने अवघ्या तीन दिवसांत संपूर्ण गोव्यात शिरकाव करीत गोव्याच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र राज्यातही प्रवेश केला. मान्सूनने महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत धडक दिली असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. आजपासून राज्यात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

काल रविवारपासून मान्सूनचे राज्यात आगमन झाले. परिणामी राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या गोमंतकीयांना राज्यातील तापमान कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला. राजधानी पणजी, जुने गोवे, डिचोली, बांबोळी, वास्को, मडगावात पावसाने रविवारी सकाळपासून हजेरी लावली.

सतर्कतेचा इशारा
अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

समुद्र खवळलेला
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्रात ताशी 45 ते 50 किमी या वेगाने वारे वहात असून मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

मच्छिमारांना इशारा
15 जूनपर्यंत मच्छीमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशातील चार राज्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भारताच्या किनारपट्टीवर बिपरजॉय धडकणार नसले तरी, याचा परिणाम देशात जाणवणार आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यांत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बिपरजॉयने मार्ग बदलला
नवी दिल्ली ः बिपरजॉय चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला असून त्याचे आता अत्यंत तीव्र वादळाच्या श्रेणीत रूपांतर झाले आहे. आता या चक्रीवादळाने मार्ग बदलला असून हे उत्तर-ईशान्य दिशेने पुढे जात आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता याआधी हवामान खात्याने वर्तवली होती. आता हे चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तानच्या दिशेने जात असून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी 175 किलोमीटरहून अधिक असून ते 15 जून रोजी दुपारी मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.