म्हादईमाता पूजन अभियानातर्फे येत्या २ ते २३ फेब्रुवारी २०२० या काळात राज्यातील बारा तालुक्यातील ३०० गावांत म्हादईमाता पूजन कार्यक्रमातून म्हादई जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य संयोजक अवधूत कामत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
येत्या २ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता गावठण-खांडेपार येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या आवारात या म्हादईमाता जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने ३०० गावातून सुमारे २ लाख नागरिकांमध्ये कलश पूजन कार्यक्रमातून म्हादई नदीबाबत जनजागृती केली जाणार आहे. या अभियान शुभारंभ कार्यक्रमात म्हादईच्या ९ उपनद्यांच्या पाण्याचे संकलन केलेल्या कलशाचे पूजन केले जाणार आहे. या कलशपूजनामध्ये १०८ दांपत्ये सहभागी होणार आहेत. राज्याच्या बारा तालुक्यांचे २० प्रखंडामध्ये विभाजन करण्यात आले आहे. २० कलशांचे पूजन करून प्रत्येक प्रभागात नेऊन त्याठिकाणी पूजनाचे कार्यक्रम केले जाणार आहेत, असेही कामत यांनी सांगितले.
राज्याचे जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविल्याची कबुली दिलेली आहे. केंद्र सरकारकडून म्हादई प्रश्नी कर्नाटकला झुकते माप देण्याच्या कटात गोवा सरकारचा सहभाग आहे. त्यामुळे गोव्यातील लोकांनी म्हादईच्या रक्षणासाठी राज्य आणि केंद्र सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, असे सुभाष वेलिंगकर यांनी यावेळी सांगितले.
दोडामार्ग तालुक्यातसुद्धा एका अभिनव पद्धतीच्या म्हादई जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.