राज्यातील संचारबंदी आठ दिवसांनी वाढवली

0
45

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लागू केलेली संचारबंदी सरकारने आणखी आठवडाभराने वाढवली आहे. त्यामुळे आता ही संचारबंदी २३ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर माहिती दिली.

संचारबंदीच्या वाढीसंबंधीची अधिसूचना नंतर काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून सरकारने सातत्याने राज्यातील संचारबंदीत वाढ केलेली आहे. राज्य सरकारने सर्वांत प्रथम ९ मे २०२१ रोजी राज्यात संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर सरकारने राज्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे पाहून वेळोवेळी ह्या संचारबंदीत वाढ केली.

आता पुढील आदेश येईपर्यंत सोमवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार असून त्यासंबंधीची अधिसूचना उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांतर्फे काढण्यात येणार आहे.
दरम्यान, संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर इतर कोणत्याही नियमांत सरकारने बदल केलेला नाही.

चोवीस तासांत ८५ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात ८५ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६८,४२३ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १३ जणांना भरती करण्यात आले.

काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ६२ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ८० आहे. कासावली ७५, पणजी ५६ अशी रुग्णसंख्या असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,८३८ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२०,१९१ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ११,२८,७२४ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

चोवीस तासांत कोरोनामुळे
राज्यात ३ मृत्यू, ७५ बाधित

राज्यातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांच्या संख्येत काल शनिवारी घट झाल्याचे दिसून आले. गेल्या चोवीस तासांत राज्यात ७५ बाधित सापडले. तसेच चोवीस तासांत तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच गेल्या चोवीस तासांत ८५ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९१२ एवढी झाली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ३१७१ एवढी आहे. काल राज्यात ४८६० जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७२,५०६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे.