Home बातम्या राज्यातील धरणांमध्ये तूर्त समाधानकारक पाणीसाठा

राज्यातील धरणांमध्ये तूर्त समाधानकारक पाणीसाठा

0

>> आमठाणे, अंजुणे, पंचवाडी धरणांत 38 टक्के, तर साळावली, चापोली व गावणे धरणांत 50 टक्क्यांहून अधिक जलसाठा

एप्रिल महिन्यात आमठाणे, अंजुणे आणि पंचवाडी येथील धरणांमध्ये पाणीसाठा 38 टक्क्यांवर आला आहे, तर साळावली धरणात 50 टक्के आणि चापोली व गावणे धरणांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे.

आमठाणे येथील जलाशयामध्ये 38 टक्के पाण्याचा साठा आहे. या जलाशयातून पाण्याचा पुरवठा बार्देश तालुक्यात पाणी पुरवणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पांना केला जातो. तसेच, डिचोली, पेडणे तालुक्यातील काही भागांना केला जातो. अंजुणे जलाशयामध्ये 38 टक्के पाण्याचा साठा आहे. सत्तरी, डिचोली तालुक्यांत या धरणाचे पाणी पुरवले जाते. गतवर्षी अंजुणे जलाशयातील पाण्याची पातळी घटली होती.
पंचवाडी येथील जलाशयामध्ये 39 टक्के पाणी साठा आहे. शिरोडा, पंचवाडी, बोरी भागात या जलाशयातील पाण्याचे शुद्धीकरण करून पुरविले जात आहे. एप्रिलच्या मध्यावर पंचवाडी जलाशयातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. या जलाशयामध्ये केवळ पावसाच्या पाण्याचा साठा करून ठेवला जातो. जलाशयामध्ये नैसर्गिक झरे नाहीत. या जलाशयाला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी साळावली धरणाचे पाणी आणण्याचे नियोजन केले जात आहे.

दक्षिण गोव्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली जलाशयामध्ये 50 टक्के पाण्याचा साठा आहे. साळावली जलाशयातून वेर्णा, मडगाव, वास्को, मुरगाव आदी प्रमुख भागात पाण्याचा पुरवठा होतो.
काणकोण तालुक्यातील चापोली जलाशयामध्ये 58 टक्के आणि गावणे जलाशयामध्ये 64 टक्के पाण्याचा साठा आहे. जलस्रोत खात्याकडून पाणीपुरवठा विभागाला कच्चे पाणी पुरविले जाते. पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे शुद्धीकरण करून नागरिकांना पुरविले जाते. जलस्रोत खात्याने राज्यातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नियोजन केले जात आहे.
राजधानी पणजीसह तिसवाडी, फोंडा तालुक्यात पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ओपा पाणी प्रकल्पाला पाण्याचा पुरवठा खांडेपार नदीतून केला जात आहे. या नदीवर ठिकठिकाणी बंधारे उभारून पाण्याचा साठा करून ठेवला जातो. खांडेपार नदीतील पाण्याचा पातळी कमी झाल्यावर बंधाऱ्यातील पाणी हळूहळू सोडून पाण्याची पातळी कायम राखली जात आहे.