>> चोवीस तासांत १९२२ बाधित, एकाचा मृत्यू
राज्यात गेल्या चोवीस तासांत उच्चांकी नवीन १९२२ कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर, एका कोरोना बळीची नोंद झाली आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २४.७६ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९२०९ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५३२ एवढी आहे.
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम आहे. दरदिवशी वाढत्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासांत नवीन ७७६१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १९२२ नमुने बाधित आढळून आले. तसेच आणखी २६१ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२९ टक्के एवढे खाली आले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने पाच बाधितांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे. तर, बरे झालेल्या चार जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत.
९ दिवसांत ९०३७ बाधित
राज्यात नववर्षात १ जानेवारी ते ९ जानेवारी या नऊ दिवसांच्या काळात ९०३७ कोरोनाबाधित आढळून आले असून १० कोरोनाबाधितांचा बळी गेला आहे. या काळात दरदिवशी चढत्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. डिसेंबर २०२१ च्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. १ जानेवारीला ३१० बाधित आढळून आले. आता, ९ जानेवारीला १९२२ बाधित आढळून आले आहेत.
निर्बंधांची अंमलबजावणी नाही
राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहे. तथापि, या निर्बंधांची योग्य प्रमाणात अंमलबजावणी होत नाही.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. जाहीर सभांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे.