राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली असून त्याला राज्यातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप काल गोवा फॉरवर्ड पक्षोचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी केला. मंगळवारी कळंगुट येथे झालेल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी वरील आरोप केला.
भाजप सरकारला राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास पूर्ण अपयश आलेले असून गोव्यासारख्या शांत राज्यात कुविख्यात गुन्हेगारंान गुुंडगिरी करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. गुन्हे करून हे गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचा आरोप काल सरदेसाई यांनी केला.
काही दिवसांपूर्वी गुंडांच्या एका टोळक्याने वास्को येथे प्रवासी बस अडवून काही प्रवाशांना मारहाण केली होती. आता कळंगुट येथे गुंडांनी थैमान घातल्याचे सांगून वारंवार होणार्या टोळी युद्धांमुळे आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची प्रतिमा डागळू लागली आहे, असे सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे जर गोव्यातील लोकांना सुरक्षा देऊ शकत नसतील तर त्यांनी त्वरीत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली आहे.