>> राजकीय आरक्षण न दिल्यामुळे सांगेतून प्रचार
लोकसभा निवडणुकीसाठीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी गोव्यातील अनुसूचित जमातींतील लोकांना राजकीय आरक्षण देण्याकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे नाराज बनलेल्या एसटी समाजाने काल सांगे तालुक्यातील ‘काजू गोटो’ या गावात जाऊन भाजपविरोधी प्रचार केला. यासंबंधी दै. नवप्रभाशी बोलताना एसटी नेते रुपेश वेळीप यांनी, लोकसभा निवडणुकीसाठीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी जर केंद्र सरकारने गोव्यातील एसटीना राजकीय आरक्षण देण्यासाठीची अधिसूचना काढली नाही तर एसटींच्या गोवाभरातील 300 गावांत जाऊन भाजपविरोधात प्रचार करण्याचा ठराव आम्ही 10 मार्च रोजी पणजी येथील आझाद मैदानावर घेतला होता. ह्या कामाचा शुभारंभ आज 17 मार्चपासून आम्ही केल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एसटींना राजकीय आरक्षण देण्यासंबंधीची अधिसूचना काढावी, अशी आमची मागणी होती आणि ती काढली नाही तर लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात काम करण्याचा व गोव्यात असलेल्या एसटी समाजाचा 300 गावात जाऊन भाजपने समाजावर कसा अन्याय केला आहे त्याची माहिती या गावातील समाजबांधवांना देण्याचा ठराव आम्ही घेतला होता. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता शनिवारी 16 एप्रिल रोजी लागू झाली आणि ती लागू होण्यापूर्वी एसटीच्या राजकीय आरक्षणासाठीची अधिसूचना काढण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला दिलेली मुदत संपली. त्यामुळे रविवारपासून आम्ही एसटी बांधवांच्या गावात जाऊन भाजपविरोधी प्रचार करण्याच्या कामाचा शुभारंभ सांगे तालुक्यातील ‘काजू गोटो’ या गावातून केल्याचे ते म्हणाले.
काल काजू गोटो या गावात तसेच सांगे तालुक्यातील कुर्पें अशा दोन गावात बैठका घेऊन केंद्रातील मोदी व गोव्यातील सावंत सरकारविरोधात प्रचार केल्याचे वेळीप यानी सांगितले.
वार्षिक अंदाजपत्रकात एसटींच्या विकासासाठी 2500 कोटी रु.ची तरतूद केलेली असते पण त्यापैकी केवळ 200 ते 300 कोटी रु. एवढाच निधी दरवर्षी एसटीच्या विकासावर खर्च केला जात असल्याचे वेळीप व रामा काणकोणकर यांनी यावेळी समाजबांधवांच्या नजरेस आणून दिले. एसटींच्या राजकीय आरक्षणाकडेही केंद्र सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले असल्याची माहिती यावेळी दिल्याचे वेळीप म्हणाले.
दोन्ही बैठकांना हजर असलेल्या एसटी बांधवांनी येत्या घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे वेळीप म्हणाले.