राज्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वांचे योगदान हवे

0
14

>> पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल; ताळगाव येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे उद्घाटन

देश आणि राज्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी, आपल्याला एकत्र यावे लागेल, आपल्याकडील सूचना द्याव्या लागतील, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सक्षमता परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काल केले.

गोवा हे एक लहान राज्य असले, तरी आपल्याला कचऱ्यासारखी समस्या भेडसावत आहे. गोव्यात कचरा समस्या सोडवण्याचा आमच्याकडे पद्धतशीर मार्ग आहे. गोव्याची लोकसंख्या 15 लाख असली, तरी परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक, पर्यटक येतात. त्यामुळे कचऱ्याच्या प्रमाणात भर पडत असते. तीन दिवसीय शिखर परिषदेत त्यावर विचार विनिमय होऊन उपाय आणि सूचना होतील ज्या राज्य सरकारला खूप मदत करू शकतात. या शिखर परिषदेत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर नक्कीच चर्चा होईल, असेही काब्राल यांनी सांगितले.

वीज प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांनी सौरऊर्जा योजनांचा आधी लाभ घ्यावा

देशात 80-85 टक्के वीज निर्मिती ही कोळशाद्वारे केली जाते. गोव्यात विजेची मागणी वाढत आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर त्यात अडथळे निर्माण करण्यात आले. राज्य सरकारने सौरऊर्जा निर्मितीसाठी सर्वांसाठी 50 टक्के अनुदान देणारी योजना जाहीर केली आहे. मात्र पर्यावरणाचे कारण पुढे करून वीज प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी सुध्दा सौरऊर्जा योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. राज्य सरकारच्या सौरऊर्जा योजनेला अल्प प्रतिसाद लाभला आहे, असे नीलेश काब्राल यांनी निदर्शनास आणून दिले.