>> वाहनचालकांसह नागरिकांची तारांबळ
राज्याच्या विविध भागांना काल सकाळी अवकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे दुचाकीचालक आणि नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. तसेच निवडणूक प्रचारात गुंतलेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना सुद्धा या पावसाचा फटका बसला.
हवामान विभागाने चार दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. सकाळपासून दमट वातावरण होते. त्यानंतर ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. परिणामी रस्त्यांवर काही प्रमाणात शुकशुकाट जाणवत होता. राजधानी पणजीसह शिवोली, वेर्ला-काणका, मये, डिचोली, साखळी, कुडणे, म्हापसा, हळदोणा, पेडणे, मोरजी, पर्वरी, बांबोळी, आजोशी-मंडूर, फोंडा, बोगमळा, वास्को आदी भागात पावसाच्या सरी कोसळल्या. जोरदार पावसामुळे दुचाकीचालक आणि नागरिकांना रस्त्यांच्या बाजूला असलेल्या दुकानांचा आधार घ्यावा लागला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. सकाळी अकरानंतर पावसाने विश्रांती घेतली. दुपारनंतर वातावरण पूर्ववत झाले. सध्या राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असून, या पावसाचा उमेदवार आणि कार्यकर्त्यांना सुद्धा फटका बसला.
गतवर्षी बाराही महिने पाऊस पडला होता. या वर्षाची सुरुवात सुद्धा पावसाने झाली असून, जानेवारी महिन्यातच अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यातील बदललेल्या हवामानामुळे जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोमवारी वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.