वाळपई केंद्राला भेट : गाय नेणार राजभवनवर
आधुनिक काळात जीवन संपूर्णपणे बदलून गेले आहे. पण आमच्या देशाची परंपरा टिकवून ठेवली पाहिजे. त्याचबरोबर गायीचे महत्त्व आबाधित ठेवण्याचीही अत्यंत गरज आहे, असे उद्गार राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी येथील अखिल विश्व गोसंवर्धन केंद्राला दिलेल्या भेटीवेळी काढले.
गोप्रेमींना उद्देशून राज्यपाल म्हणाल्या की, गोसंवर्धन करणार्यांची केवळ प्रशंसा न करता त्यांचा आदर केला पाहिजे. कारण गाय ही अमृततुल्य आहे. गोसंवर्धनाचे कार्य हृदयातून केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेचे समर्थन करताना त्या म्हणाल्या की, पुढील एका वर्षात स्वच्छतेत भारत पहिल्या स्थानावर येणार आहे. त्यासाठी भारतातील सर्वांचा हातभार महत्त्वाचा आहे. सदिच्छा भेटीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्यपाल मृदुला सिन्हा, त्यांचे पती माजी केंद्रीय मंत्री राम गोपाल सिन्हा, वाळपईचे नगराध्यक्ष रामदास शिरोडकर, गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब, रामचंद्र जोशी उपस्थित होते. राज्यपालाकडून गायीची पूजा
राज्यपाल मृदुला सिन्हा काल येथील अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात सायंकाळी गायीचे विधीवत पूजन केले व केंद्राची पहाणी केली.
राज्यपाल गाय पाळणार
वाळपई गोसंवर्धनातील एक गाय राज्यपाल मृदुला सिन्हा राजभवनात सांभाळण्यासाठी नेणार आहेत त्यासाठी राज्यपालांनी राजभवनात लहानसा गोठा बांधला आहे.
राज्यपालांकडून केंद्राला मदतीचे आश्वासन
गोसंवर्धन केंद्राला सरकारकडून अजूनही मदत मिळत नाही. त्यासाठी आपण सरकारकडे बोलणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.