>> विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
गोवा विधानसभेच्या सहा दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता प्रारंभ होणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. राज्यातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला विविध प्रश्नांवर घेरण्याची रणनीती तयार केली आहे.
राज्य विधानसभेचे अधिवेशन 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्यामुळे 6 फेब्रुवारी रोजी अधिवेशनाचे कामकाज होणार नाही. या दिवसाचे कामकाज 10 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी राज्यपाल पिल्लई यांचे अभिभाषण होणार आहे. सोमवार 5 फेब्रुवारीपासून प्रश्नोत्तरी, लक्षवेधी सूचना, शून्य प्रहर आदी कामकाज होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येत्या 8 फेब्रुवारीला राज्याचा वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
या अधिवेशनासाठी आमदारांनी एकूण 1367 प्रश्न सादर केले आहेत. त्यात 316 तारांकित प्रश्न आणि 1051 अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे. या अधिवेशनात 9 फेब्रुवारी रोजी खासगी कामकाजाच्या दिवशी पाच खासगी ठराव चर्चेसाठी मान्य करण्यात आले आहेत.
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पर्वरी येथील विधानसभा संकुल आणि पणजी महानगरपालिका परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात धरणे, मोर्चा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
एसटी आरक्षणाचा विषय
उपस्थित करणार : विजय
विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मिशन एसटीच्या शिष्टमंडळाने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांची काल भेट घेऊन एसटी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची मागणी केली. गोवा फॉरवर्ड पक्ष राजकीय आरक्षणासाठी एसटी समाजाला पूर्ण पाठिंबा देणार आहे, अशी ग्वाही गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शिष्टमंडळाला दिली. विधानसभा अधिवेशनात एसटी राजकीय आरक्षणाचा विषय उपस्थित करण्याचे आश्वासन सरदेसाई यांनी दिले आहे.