राष्ट्रपतींद्वारे 13 राज्यपाल, उपराज्यपालांंची नियुक्ती
गोव्याचे सुपुत्र व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची अत्यंत महत्त्वाचे असे एक राज्य असलेल्या बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र आर्लेकर यांच्या जागी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिवप्रसाद शुक्ला यांची वर्णी लावण्यात आली आहे.
तर बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
13 राज्यपाल, उपराज्यपालांच्या नियुक्त्या
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. तर लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, पीव्हीएसएम, यूवायएसएम, वायएसएम (निवृत्त), अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल म्हणून, सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य,
झारखंडचे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला, आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया,
आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर,
आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून, छत्तीसगढचे सध्याचे राज्यपाल श्रीमती अनुसुया उकिये यांची मणिपूरचे राज्यपालपदी, मणिपूरचे राज्यपाल गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून, बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयच्या राज्यपाल पदावर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची, बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची तर अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जबाबदारी पार पाडणार : आर्लेकर
आतापर्यंत मी हिमाचल प्रदेशचा राज्यपाल होतो. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बिहारचा राज्यपाल म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. माननीय राष्ट्रपतींनी दिलेली जबाबदारी आपण अत्यंत निष्ठेने पार पाडणार आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र आर्लेकर यांनी दिली आहे. बुधवारी हिमाचल प्रदेशला जाणार असून तेथील जबाबदारी पूर्ण करून पुढील आठवड्यात आपण बिहारचा राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारणार असल्याचे श्री. आर्लेकर यांनी स्पष्ट केले.