महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील तीन वेळाचे विजेती चेन्नई सुपर किंग्स आणि ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स यांच्यात आज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मधील चौथी लढत शारजा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत तीन वेळा स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केलेले असून १२व्या पर्वाचे ते उपविजेते आहेत. त्यातच यंदाच्या आयपीएलच्या आपल्या शुभारंभी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला नमवित गेल्या वर्षाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा घेतला असल्याने त्यांचे मनोबल उंचावलेले असेल.
दुसर्या बाजूने राजस्थानच्या जमेची बाब म्हणजे त्यांचा ऑस्ट्रेलियन कर्णधार पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी स्टीव्ह स्मिथच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळू शकला नाही. त्यानंतर स्मिथला ‘कन्कशन टेस्ट’ द्यावी लागली. त्यात तो पास झाला. तो आता पूर्णतः तंदुरुस्त झालेला असून ‘कन्कशन टेस्ट’मध्येही तो उत्तीर्ण झालेला आहे. त्यामुळे तो पहिल्या लढतीसाठी उपलब्ध असेल. असे असले तरी राजस्थानला अन्य दोन स्टार खेळाडू बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांच्या गैरहजेरीत खेळावे लागणार आहे. बेन स्टोक्स वडील आजारी असल्याने न्यूझीलंडमध्ये आहे. तर जोस बटलर आपल्या परिवारासमवेत उशिरा दुबईत पोहोचलेला असल्याने त्याला दुबईत ३६ तासांच्या अलगीकरणात रहावे लागले आहे.
उथप्पा प्रथमच राजस्थान रॉयल्सकडून खेळणार असल्याने त्याच्यावर संघाची मध्यफळी सांभाळण्याची जबाबदारी राहील. परंतु त्याच्यासह संजू सॅमसन, यशस्वी जैसवाल, रियान पराग, जयदेव उनाडकट आणि श्रेयस गोपाल यांनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारतीय खेळाडू अपयशी ठरल्यास कर्णधार स्मिथ आणि त्याच आस्ट्रेलियन साथीदार डेव्हिड मिलरवर संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी असेल, तर गोलंदाजीने नेतृत्व इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर व ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू टायवर असेल.
चेन्नईकडून आजही विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो खेळणार नाही आहे. अजूनही तो दुखापतीतून सावरलेला नाही आहे. पहिल्या लढतीत अंबाती रायडू आणि फाफ डुप्लेसिसने आपल्या अपेक्षेनुरुप काम केलेले आहे.
अंतिम संघ यातून निवडले जातील : राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सैमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वी जायसवाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशेन थॉमस, अँड्र्यू टाय, डेव्हिड मिलर, टॉम कुर्रन, अनिरुद्ध जोशी, श्रेयस गोपाल, रियान पराग, वरुण आरोन, शशांक सिंह, अनुज रावत, महिपाल लोमरोर, मयंक मार्कंडेय.
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायडू, फॅफ डुप्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रविंद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिचेल सॅँटनर, जोश हेझलवूड, शार्दुल ठाकुर, सॅम कुर्रन, एन जगदीशन, के. एम. आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.