युद्धसज्जता आणि मुत्सद्दीपणा

0
148
  • प्रा. अशोक ढगे

युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले असताना पाकिस्तान आणि नेपाळची साथ त्या देशाला मिळत आहे. केवळ सैन्यबळाच्या जोरावर युद्ध जिंकता येत नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्दीपणा दाखवून चीनची कोंडी करावी लागेल. यावेळी भारताने युद्धसज्ज होण्याबरोबरच जागतिक ताकद आपल्यामागे उभी केली. त्यामुळे चीनची कोंडी झाली आहे.

गेल्या पाच मे पासून चीन गलवान खोर्‍यात ठाण मांडून बसला आहे. १५ जूनची चकमक आणि २९-३० ऑगस्टला झालेला गोळीबार पाहता या घटनांना दुय्यम लेखून चालणार नाही. गेल्या ४५ वर्षांमध्ये दोन्ही देशांदरम्यान कधीही गोळीबार किंवा सैन्यांमध्ये चकमक झाली नव्हती. चीनमध्ये सध्या अंतर्गत प्रश्‍नांनी डोके वर काढले आहे. तिबेट, हॉंगकॉंगच्या प्रश्‍नावरून चीन अडचणीत आला आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांना पक्षांतर्गत विरोधकांनी हैराण केले आहे. त्यातच चीनने ‘कोरोना’च्या विषाणूची प्रयोगशाळेत निर्मिती केल्याचा पुरावा आता चीनचेच साथरोगतज्ज्ञ ली यांनी देण्याचे जाहीर केले आहे. जागतिक कोंडी आणि भारताने घेतलेली विरोधी भूमिका यामुळे चीन खवळला आहे. जागतिक महासत्ता होण्यात भारताचाच मोठा अडथळा आहे, असे चीनला वाटते. त्यामुळे तर चीनने भारताला वेढा घातला आहे. नेपाळ, पाकिस्तानसह सर्व सीमांवर सैन्य तैनात केले आहे.

चीनची आगळीक लक्षात घेऊन भारतानेही सीमेवर युद्ध-साहित्य आणि सैनिक तैनात ठेवले आहेत. एकट्या गलवान खोर्‍यात एक लाख सैन्य तैनात करण्यात आले आहे. चीनने तिथे ऑप्टिकल ङ्गायबर यंत्रणा टाकली आहे. भारत आणि चीनने सीमाभागात पायाभूत सुविधा वाढवण्याची स्पर्धा चालवली आहे. सैन्याच्या हालचाली वेगाने व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे लष्करी अधिकारी पातळीवर चर्चा, दुसरीकडे राजकीय पातळीवर भेटीगाठी आणि तिसरीकडे मुत्सद्दी चर्चा असे सर्व मार्ग अवलंबले जात असले तरी अजून सीमेवरचा तणाव निवळायला तयार नाही. चीनची जागतिक पातळीवर अधिक कोंडी होत गेली तर तिसरं महायुद्ध होण्याची भीती काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

१९६२ चा भारत आता बदलला आहे, हे चीनला कळून चुकले आहे. त्याचबरोबर चीनही आता १९६२ चा राहिलेला नाही. चीन आर्थिकदृष्ट्या भारताच्या चौपट मजबूत आहे. चीनमध्ये शी जिनपिंग आता तहहयात अध्यक्ष झाले आहेत. भारतात लोकशाही प्रणाली आहे. हुकूमशाहीविरोधात लोकशाही असा हा संघर्ष आहे. नावालाच लोकशाही असलेल्या पाकिस्तान आणि नेपाळची साथ चीनला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारताने जागतिक बाजारातून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी केली; शिवाय रशियाच्या मैत्रीतून पाकिस्तान आणि चीनला अशी शस्त्रास्त्रं मिळणार नाहीत, याची तजवीज केली. हे सर्व सुरू असताना भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने आपली बाजू मजबूत केली. लडाखच्या पूर्वेकडील भागात पँगॉंग सरोवर परिसरातल्या सर्व उंच डोंगरांवर भारताने मजबूत मोर्चेबांधणी केली आहे. या मोर्चेबांधणीमुळे भारताला चीनच्या प्रत्येक लष्करी हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होत आहे. चीन ज्या सैन्यतळांना आणि रस्त्यांना स्वतःची ताकद समजत होता, त्यातल्या बहुसंख्य जागा भारतीय लष्कराच्या ङ्गायरिंग रेंजमध्ये आल्या आहेत. तसेच सर्व जागांवर चिनी हालचालींवर लक्ष ठेवून पुढील योजना आखणे भारतासाठी सोपे झाले आहे. लष्करीदृष्ट्या भारत वरचढ झाला आहे.
भारत कमकुवत आहे, आपण पुढे सरसावल्यास काही करणार नाही असे समजून चीनने घेराव घालण्याचा डाव आखला; मात्र गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीआधारे स्पेशल ङ्ग्रंटिअर ङ्गोर्सच्या जवानांनी चीनचा डाव उधळला. एसएङ्गएङ्गच्या नेतृत्वाखालील सैन्याने डोंगरांवर मोर्चेबांधणी केली. त्यामुळे चीनच्या योजना कागदावरच राहिल्या. गलवान खोर्‍यात चिनी जवानांशी झालेल्या प्राणघातक संघर्षानंतर भारताचा आत्मविश्‍वास वाढला. या वाढलेल्या आत्मविश्‍वासाच्या जोरावर भारताने पँगॉंग सरोवर परिसरातली मोहीम यशस्वी केली. सध्याच्या स्थितीत लडाखच्या पूर्वेकडील भागात भारत ‘ऑन टॉप’ असल्यामुळे चीनची बाजू कमकुवत झाल्याचे निरीक्षण चिनी संरक्षणतज्ज्ञ गॉर्डन जी चँग यांनी नोंदवले. अपयश झाकण्यासाठी स्थानिक पातळीवरचे चिनी अधिकारी पुढील काही काळ वारंवार भारतीय तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील; पण भारताची स्थिती मजबूत असल्यामुळे चीनसाठी यश मिळवणे कठीण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला मिळालेल्या अपयशाचे चीनच्या राजकीय व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. लवकरच पीएलएमधील अधिकार्‍यांच्या पातळीवरही बदल दिसू शकतात, असं मत गॉर्डन जी चँग यांनी व्यक्त केले.

चीनने आतापर्यंत इतर देशांच्या अनेक शस्त्रांच्या डिझाईन्सची नक्कल करून स्वतःच्या नावाने मिरवली. मात्र, अंधारात हवेतल्या हवेत लढाऊ विमानांना इंधन भरण्याचे तंत्रज्ञान चीनकडे नव्हते. नुकतेच चीनने नौदलाच्या जे-१५ लढाऊ विमानाच्या सहाय्याने हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता यशस्वीपणे विकसीत केली. भारताने इस्त्राईलकडून अवॅक्ससारखी प्रक्षेपणास्त्ररोधक यंत्रणा घेतली आहे. दहा राङ्गेल लष्करात दाखल झाली आहेत. आतापर्यंत जगात अमेरिकन नौदल आणि वायुदल हवेतल्या हवेत इंधन रिङ्गील करण्यासाठी तरबेज मानले जात होते. मात्र, आता त्या रांगेत चीनसुद्धा येऊन उभा राहिल्यामुळे अमेरिकेसाठीही मोठे आव्हान मानले जात आहे. चिनी वायुदलाचा आत्मविश्वास आकाशाला भिडला आहे. म्हणूनच एकीकडे इंधन भरण्याची क्षमता विकसीत केल्यानंतर दुसरीकडे चीनने दीड महिन्यात पहिल्यांदाच दक्षिण चिनी समुद्रात युद्धसराव सुरू केला. समुद्रात उभे केलेले टार्गेट चिनी विमानांनी नष्ट केले. पाश्‍चिमात्य मीडियाच्या माहितीनुसार, चीनचा हा सराव म्हणजे अमेरिकेच्या युद्धनौकांवर हल्ला करण्याची रंगीत तालीम होती. त्यामुळे आता चिनी विमानांना चितपट करण्यासाठी अमेरिकन नौदलालाही पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे.

या वळणावर जगात चीनबरोबर किंवा चीनविरोधात आपली मांड पक्की करण्याच्या दिशेने उभ्या ठाकत असलेल्या देशांच्या भूमिकांचा आणि शस्त्रसज्जतेचाही विचार करायला हवा. तसे केल्याने यापुढील काळात कोणते देश कोणत्या गटात राहतील याचा अंदाज येईल. आपल्या आक्रमक भूमिकेसाठी इस्त्रायल जगभर ओळखला जातो. इस्त्रायलच्या लष्करी ताकदीबद्दलही अनेकदा बोलले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये इस्त्रायलबरोबर झालेल्या करारांमुळे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, बहरीन हे देश पाकिस्तानपासून दुरावले असून आता त्यांची भारताशी मैत्री अधिक दृढ होत आहे. दरम्यान, चीन आणि इराणची मैत्री झाल्यामुळे भारत एका मित्राला मुकण्याची शक्यता आहे. तुर्कस्थानही आता पाकिस्तानची तळी उचलायला लागला आहे. मलेशियाही त्याच वाटेवर आहे. एकंदरीत, जागतिक पातळीवर विविध देश शस्त्रसज्ज होत असतानाच आपली जागा निश्‍चित करू लागले आहेत. अमेरिकेबरोबर राहायचे की रशियाबरोबर हा मुद्दा राहिला नसल्याने चीनबरोबर राहायचे की अमेरिका-भारत गटाशी सख्य राखायचे याचा विचार बहुसंख्य देश करताना दिसत आहेत. युरोप शांत असल्याने जर्मनी, ङ्ग्रान्स आदी देशांना आजघडीला ठाम भूमिका घेण्याची गरज नाही. मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी विस्तारवादी धोरणामुळे अनेक देश चीनविरोधात जात आहेत.

जागतिक राजकारणावर याचा परिणाम कसा होणार हे आता पाहावे लागणार आहे. मात्र, भूमिकांच्या या ङ्गेरमांडणीला अनेक मुद्दे खतपाणी किंवा खो घालणार आहेत. त्यात चीनचा विस्तारवाद महत्त्वाचा ठरणार आहे. चीनच्या पंखाखाली जायचे की स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व कायम राखत शस्त्रसज्ज व्हायचे आणि जागतिक पातळीवर नवे दोस्त जोडायचे याबाबत आता अनेक देश ठोस भूमिका घेताना दिसतील. या भूमिकेमुळे भविष्यात भारत-चीन संघर्ष जगातल्या दोन गटांमधला संघर्ष म्हणून अधोरेखित होऊ शकतो. त्या दिशेने जागतिक मुत्सद्दीपणा आणि शस्त्रसज्जतेचा प्रवास सुरू झाला आहे, एवढे नक्की…