राजस्थानसमोर आज मुंबईचे आव्हान

0
84

मुंबई इंडियन्स संघ आणि राजस्थान रॉयल्स संघात आज यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या पर्वातील १९वी लढत अबुधाबीत खेळविण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स संघ पूर्ण बहरात असून राजस्थान रॉयल्स संघासमोर कडवे आव्हान असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धची लढत सुपर ओव्हरमध्ये गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने शानदार पुनरागमन करताना किंग्स इलेव्हन पंजाबला ४८ धावांनी तर सनरायझर्स हैदराबाद संघाला ३४ धावांनी नमवीत विजयी लय पकडलेली आहे. पाच पैकी तीन लढती जिंकत मुंबई इंडियन्स संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचलेली आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाने चांगली सुरुवात करताना सलग दोन सामने जिंकले होते. परंतु त्यानंतर त्यांना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून पराभव स्वीकारावे लागलेले आहेत. त्यामुळे दोन विजय आणि दोन पराभवांसह ते गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर घसरलेले आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी जमेची बाब म्हणजे त्यांचा दक्षिण आफ्रिकन सलामीवीर क्वींटन डी कॉक लयीत परतलेला आहे. गेल्या सामन्यात अपयशी ठरलेला कर्णधार रोहित शर्मा आज विस्फोटक खेळी करण्यासाठी आसूसलेला असेल. सूर्यकुमार यादव व ईशान किशन मध्यफळीत चांगली कामगिरी करीत आहेत. तर अंतिम हाणामारीच्या षटकांत कीरॉन पोलार्ड, हार्दिक व कृणाल हे पंड्या बंधू प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बौल्ट, जेम्स पॅटिंसन आणि जसप्रीत बुमराह यांनी गेल्या सामन्यात शानदार मारा केलेला आहे. फिरकीच्या विभागात राहुल चहर आणि कृणाल पंड्या राजस्थानसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

दुसर्‍या बाजूने राजस्थान रॉयल्स संघाला इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची उणीव बरीच जाणवत आहे. तो क्वारंटाईन काळ पूर्ण केल्यानंतर ११ ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहे. राजस्थानला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर कर्णधार स्मिथ, जोस बटलर व संजू सॅमसन यांना मोठ्या खेळी कराव्या लागणार आहेत. रॉबिन उथप्पा आणि रियान पराग यांनीही उपयुक्त योगदान देण्याची गरज आहे. खालच्या फळीत राहुल तेवातिया आणि आर्चरकडेही फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. गोलंदाजीतील प्रभावहीन मारा ही राजस्थानच्या चिंतेची बाब असेल.
राजस्थान रॉयल्स (संभाव्य) : जोस बटलर (यष्टिरक्षक), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, राहुल तेवातिया, महिपाल लोमर, रियान पराग/अंकित राजपूत, टॉम करन, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट.

मुंबई इंडियन्स (संभाव्य) ः क्वींटन डी कॉक (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, जेम्स पॅटिंसन, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जसप्रीत बुमराह.