राजस्थानचे रण

0
27

एकीकडे कर्नाटकमधील दणदणीत विजयाने अस्मान ठेंगणे झालेल्या काँग्रेस पक्षाला राजस्थानात सचिन पायलटांच्या उघडउघड बंडाने पुन्हा जमिनीवर आणले आहे असेच म्हणायला हवे. राजस्थानची विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना सचिन पायलट यांनी आपल्याच काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध पाच दिवसांची अजमेर ते जयपूर अशी जनसंघर्षयात्रा नामक पदयात्रा काढली. तत्पूर्वी त्यांनी गेहलोत सरकारविरुद्ध धरणेही धरले होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर या अस्तनीतल्या निखाऱ्याचे करायचे काय असा पेच काँग्रेस नेतृत्वालाही पडला असेल. पायलट आणि गेहलोत यांच्यातील मतभेदांचा इतिहास सर्वज्ञात आहे. 2018 मध्ये राजस्थान काँग्रेसने जिंकले तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांनी आपली दावेदारी पुढे करून पक्षश्रे ष्ठींपुढे पेच निर्माण केला होता. परंतु तेव्हा अशोक गेहलोत यांनी आपल्या ज्येष्ठतेचा वापर करीत मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतले. पायलट यांनी पुन्हा बंड केले आणि अठरा समर्थक आमदारांनिशी गेहलोत यांचे सरकार त्यांनी जवळजवळ पाडल्यात जमा झाले होते. पण राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी स्वतः पायलट यांची समजूत घातली आणि त्यांना कड्याच्या काठावरून माघारी आणले. परंतु गेहलोत आणि पायलट यांच्यातील दरी काही त्यांना मिटवता आली नाही. मध्यंतरी काँग्रेस अध्यक्षपद गांधीतर व्यक्तीकडे देण्याची वेळ ओढवली तेव्हा गांधी घराण्यातर्फे अशोक गेहलोत यांचे नाव पुढे करण्यात आले होते. जी 23 बंडखोर गटातील शशी थरूर यांनी अध्यक्षपदासाठी स्वतःचे नाव पुढे केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी गहलोत यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, म्हणजे सचिन पायलटांकडे राजस्थानची सूत्रे बहाल करून त्यांचा असंतुष्ट आत्मा शांत करता येईल असा डाव टाकला होता, परंतु गेहलोत त्याला बधले नाहीत आणि परिणामी सचिन पायलटांचे विमान उडालेच नाही. परिणामी तेव्हापासून ते सतत खदखदत राहिले आहेत आणि आता जसजशी निवडणूक जवळ येते आहे, तसतशी त्यांची ही खदखद जोरात बाहेर पडू लागली आहे. भाजपने जसे काही राज्यांचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या तोंडावर बदलले, तसे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राजस्थानमध्ये नेतृत्वबदल करून आपल्याकडे मुख्यमंत्रिपद द्यावे व आगामी निवडणुकीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून आपल्यालाच जनतेपुढे प्रस्तुत करावे अशी सचिन यांची आत्यंतिक इच्छा आहे. त्यासाठीच ते गेहलोत यांच्याविरुद्ध रान पेटवू लागले आहेत. मध्यंतरी गेहलोत यांनी सचिन पायलटांच्या बंडाचा उल्लेख करीत तेव्हा आपल्या पक्षाचे आमदार खरेदी करायला वसुंधरा राजेंनी विरोध केला होता असे सांगून त्यामुळेच आपले सरकार तेव्हा वाचले असा दावा केला आणि सचिन यांचा पुन्हा तिळपापड उडाला. गेहलोत यांनी त्या विधानातून एका दगडात दोन पक्षी मारले. वसुंधराराजे ह्या भाजपच्या जुन्या फळीतील नेत्या. सध्याच्या मोदी – शहांशी त्यांचे फारसे जुळत नाही. त्याचा अचूक फायदा उठवत वसुंधरांचे कौतुक करून गेहलोत यांनी आपला हिशेब चुकता केला. सचिन पायलट यांनी आता वसुंधराराजेंविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असूनही गेहलोत सरकारने त्यांच्यावर गेल्या साडेचार वर्षांत कारवाई केली नसल्याबद्दल आपल्या जनसंघर्ष यात्रेत आकाशपाताळ एक केले. ज्याप्रमाणे ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपने जवळ केले, तसा भाजप आपल्यालाही जवळ करायला इच्छुक असेल हे न कळण्याइतके सचिन दूधखुळे नाहीत, परंतु त्यांनी काँग्रेसमध्ये राहून गेहलोत यांच्याविरुद्ध दुगाण्या झाडणे सध्या तरी भाजपसाठी अधिक फायद्याचे आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केली जाऊ शकतात. पायलट हे नाही म्हटले तरी गुज्जर समाजाचे नेते आहेत. पिता राजेश पायलट यांची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. गेल्या निवडणुकीत ते मुख्यमंत्री बनतील या अपेक्षेने गुज्जरांनी काँग्रेसच्या बाजूने भरभरून मतदान केले होते. त्यामुळे आपल्या या नाराज तरुण तुर्काला शांत कसे करायचे हा काँग्रेसपुढील पेच आहे. गांधी कुटुंबाने सध्या तरी राजस्थानमधील या संघर्षापासून अलिप्तता स्वीकारली आहे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गेहलोत सरकारच्या कामगिरीच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत. येत्या निवडणुकीमध्ये कर्नाटकची रणनीती वापरून राजस्थानमधील सत्ता राखण्याचे स्वप्न काँग्रेस पक्ष पाहतो आहे. परंतु सचिन पायलट यांची बंडाळी त्यात खोडा बनून राहिली आहे. जी एकजूट आणि समंजसता कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दाखवली ती जर गेहलोत आणि पायलट यांना दाखवता आली असती, तर राजस्थान पुन्हा सर करणे काँग्रेससाठी कठीण नव्हते. मात्र, सध्याची दोघांतली थारी – मारी काँग्रेसलाच भारी पडण्याची स्थिती आहे.