राजयोगिनी सती अहिल्या

0
32
  • गिरिजा मुरगोडी

अर्थशास्त्र, समाजशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या कशाचेही लौकिकार्थाने शिक्षण घेतलेले नसताना सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या, सुविहीतपणे योजनांची कार्यवाही करणाऱ्या, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अहिल्याबाईंचा जीवनपट म्हणजे अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासातले एक आगळे-वेगळे लक्षवेधी पान. सती अहिल्येच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने घडलेली ही स्मरणयात्रा…

काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, महेश्वर येथे जाण्याचा योग आला. वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा आणि उत्सुकता होती. बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर, ओंकारेश्वर ही दोन ज्योतिर्लिंगं या प्रदेशात आहेत. तिथे जाऊन शिवशंभोचे दर्शन, इंदूर येथील होळकरांचा राजवाडा, इंदूरचा सराफा बाजार, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे महेश्वरातील निवासस्थान, किल्ला, मंदिर, घाट, खूप आवडणाऱ्या ‘महेश्वरी’ साड्या अशी अनेक कारणे या इच्छेमागे होती.
प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा मात्र लक्ष वेधून घेतले, सर्वाधिक भावले आणि मनात रेंगाळत राहिले ते महेश्वर, तिथले वातावरण, सुंदर मंदिर, सुबक घाट, अथांग नर्मदेचे शांत चैतन्यमय दर्शन, मंदिरातल्या अर्चना, वैशिष्ट्यपूर्ण असे कोटिलिंगार्चन, कर्तृत्ववान साध्वी अहिल्यादेवीचे साधेेसे निवासस्थान, शिवमंदिर, शिवलिंग, दरबार भरण्याची जागा, घाटावरच्या छत्र्या आणि सर्वांमध्ये सौम्यपणे लहरत असलेले अहिल्याबाईंचे मंगलमय अस्तित्व. त्या शुभ्रवसना देवीचा हातात शिवलिंग धरलेला पूर्णाकृती पुतळा. सात्त्विक तेजाने उजळलेली शांत मुद्रा आणि अजूनही सर्वांचे क्षेमकुशल जपत असल्यासारखी ममतामयी स्नेहल आश्वासक दृष्टी. कितीतरी वेळ तिथून निघावेसेच वाटत नव्हते. त्या साध्वीचा जीवनपट आणि कार्यकर्तृत्वाचा आलेख चित्रं, छायाचित्रं, छोट्या-छोट्या प्रतिकृती, माहिती अशा माध्यमातून आकर्षकपणे प्रस्तुत केलेले संग्रहालय इंदूरला नुकतेच पाहिले होते. तेव्हा अवाक्‌‍ झालेले मन पुन्हा एकदा त्या चरणांशी लीन झाले. थक्क करणारे कर्तृत्व असलेल्या या साध्वीने आयुष्यात किती चढ-उतार पेलले, किती कटू घोट रिचवले, किती दुःखे सोसली, किती कसोटीचे प्रसंग समर्थपणे निभावले याची गणतीच करता येणार नाही.
संपूर्ण भारतभर जनमानसांत आणि विविध राज्यकर्त्यांच्या मनातही; एक सात्त्विक करुणामयी तितकंच खंबीर, करारी व्यक्तिमत्त्व म्हणून विशिष्ट स्थान त्यांनी मिळवले. आज तीनशे वर्षे उलटली तरी देशाच्या कोनाकोपऱ्यात त्यांच्याबद्दल आदरभाव जागा आहे तो त्यामुळेच.

भारताच्या चारी दिशांना मंदिरे, धर्मशाळा, घाट बांधणे, तळी-विहिरी खोदणे, अन्नछत्र चालविणे, विविध उद्योगधंदे उभारणे, राज्यकारभार सांभाळणे, सर्व थरातील जनसामान्यांच्या हिताचे रक्षण करणे हे सर्व अहिल्याबाईंनी केले तरी कसे असावे, असे पुन्हा पुन्हा मनात येते. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या कशाचेही लौकिकार्थाने शिक्षण घेतलेले नसताना सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या, सुविहीतपणे योजनांची कार्यवाही करणाऱ्या, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अहिल्याबाईंचा जीवनपट म्हणजे अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासातले एक आगळे-वेगळे लक्षवेधी पान.
31 मे 1725 या दिवशी या हिरकणीचा जन्म झाला. बुद्धिमान, चुणचुणीत, सुसंस्कारसंपन्न अशा या गुणी बालिकेने लहानपणीच सर्वांची मने जिंकून घेतली होती. बीड परगण्यातले चौंढी हे छोटेसे गाव. त्या चौंढी गावचा पाटील माणकोजी शिंदे, त्यांची मुलगी अहिल्या. पाटीलकी आणि घर-शेतीवाडी असलेल्या माणकोजीचे कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होते. मुलाबाळांचे नांदते घर. आठ वर्षांची चिमुरडी अहिल्या घरातली कितीतरी कामे चटपटीतपणे आवरत असे. रोज देवळात तेलवात लावत असे. माता-पित्यांच्या छत्रछायेखाली सुसंस्कार घेत निर्वेध जीवन अनुभवत वाढत होती.

पण तिच्या पुढच्या जीवनाचा मार्ग सुनिश्चित करणारी एक घटना एका अनमोल योगाच्या रूपाने चालत आली आणि तिला एका अनोख्या कर्तबगार वाटेवर घेऊन गेली. सन 1733 ची गोष्ट. पेशव्यांचे मातब्बर सुभेदार मल्हारराव होळकर राजनैतिक कामासाठी पुण्याला निघाले होते. मार्गावर चौंढी गाव लागले. गावच्या शिवमंदिराच्या प्रांगणात राहुट्या उभारून मुक्काम करण्याचे ठरले. सोबत हत्ती, घोडे, बारगीर, शिलेदार असा सर्व सुभेदारी सरंजाम होता. मुक्काम पडला. मल्हारराव राहुटीच्या दारात बसून सभोवार पाहत होते. सूर्य मावळला. दिवेलागणीची वेळ झाली. परकर-पोलक्यातली एक मुलगी मंदिराजवळ आली. तिच्या हातात देवळात तेलवान लावण्याचे सर्व साहित्य होते. राहुट्या, हत्ती, घोडे यांकडे कुतूहलाने पाहत ती देवळात शिरली. खांबाजवळच्या दिव्यांमध्ये तेल घालून वाती उचलल्या. मग गाभाऱ्यातले दिवे उजळले. ती अगदी झरझर काम करत होती. रूपाने सर्वसाधारण, पण चुणचुणीत, निर्भय आणि निरागस. दोन्ही हात जोडून, डोळे मिटून उभ्या असलेल्या तिचा चेहरा ज्योतींच्या मंद प्रकाशाने उजळून गेला होता. अशी सुलक्षणी पोर पाहताना मल्हाररावांच्या मनाने आतून कौल दिला- हीच माझी सून! त्यांनी सर्व माहिती काढली. घर, कुटुंब, मुलगी सर्व मनपसंत वाटले. आणि 1733 मध्ये मल्हाररावांच्या इतमामाला साजेशा थाटामाटात अहिल्या आणि खंडेराव होळकर यांचा विवाह झाला. इथूनच अहिल्येच्या जीवनमार्गाला अनोखी दिशा मिळाली.

1733 मध्ये वाड्यात प्रवेश झालेली ही नववधू, ऐश्वर्यसंपन्न घरातली ही सून सासू गौतमाबाईंच्या पाठोपाठ वाडाभर वावरू लागली. त्यांच्याबरोबर देवळात पोथ्यापुराणांना जाऊ लागली. व्रतवैकल्ये, उपासतापास करू लागली. हळूहळू वाड्यातला कोपरान्‌‍ कोपरा तिला माहीत झाला. वाड्यातला प्रत्येक माणूस ती ओळखू लागली. समंजस वृत्ती, मोजके बोलणे, विनम्र वागणे, सोपवलेली कामे बिनबोभाट पार पाडणे, विवेचक बुद्धी, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे तिने लहानथोरांची मने जिंकून घेतली होती. मल्हारराव, गौतमाबाई समाधानात होते.

26 जानेवारी 1740 या दिवशी खंडेरावांना शिलेदारीची वस्त्रे दिली गेली. मल्हारराव आपल्या हाताखाली खंडेरावांना तयार करत होते. गौतमाबाईंच्या हाताखाली अहिल्याबाई तयार होत होत्या. सुनेची समज जाणून मल्हाररावही काही कामे त्यांच्यावर सोपवत असत आणि अहिल्याबाई ती नीटसपणे पार पाडीत.
लढाईच्या वेळी मराठ्यांमध्ये बारगिरांपासून सरदारांपर्यंत सगळ्यांचे कुटुंबकबिले बरोबर असत. वयात आल्यानंतर अहिल्याबाई खंडेरावांच्या बरोबर जाऊ लागल्या. लढाईच्या क्षेत्रापासून जवळच डेरे उभारलेले असत. तेथेच बांधकाम मंडळींचा मुक्काम असे. आता अहिल्याबाईंना रणभूमी प्रत्यक्ष दिसू लागली. मल्हारराव खंडेरावाला लढाईच्या मसलती सांगत असत. मराठ्यांचा गनिमीकावा, युद्धपद्धतीचे बारकावे, डावपेच उलगडून दाखवत असत. आपले मुलूख, परगणे, माळव्यातली सत्ता, पुण्याचे पेशवे, सातारची छत्रपतींची गादी हे सर्व त्यांच्या बोलण्यात येत असे. जवळपास असणाऱ्या अहिल्याबाई हे सर्व अगदी एकाग्रपणे ऐकत, समजून घेत असत. त्यांचा गंभीर चेहरा, सतर्क मन, तल्लख बुद्धिमत्ता, एकाग्र श्रवण हे सर्व मल्हाररावांच्या चाणाक्ष नजरेने टिपले. सून आपल्या पुत्रापेक्षा सरस आहे हे त्यांनी केव्हाच जाणले होते. सुनेच्या मनात आपला शब्दन्‌‍ शब्द कोरला जात आहे हे त्यांच्या लक्षात आले. मल्हारराव लहान लहान जबाबदाऱ्या सुनेवर सोपवू लागले. सून त्या चोख पार पाडू लागली, तसे आणखी जबाबदाऱ्या सोपवू लागले. तोफांसाठी लागणारी दारू कशी तयार करायची, तो कारखाना कसा लावायचा, तो रणक्षेत्रापासून किती अंतरावर असला पाहिजे, विशिष्ट तोफा वाहून नेण्याचे काम कसे करायचे असते अशा कितीतरी गोष्टी ते सुनेला शिकवू लागले. मल्हारराव होळकरांच्या खजिन्याची किल्ली अहिल्याबाईंच्या ताब्यात आली. त्यांचा दबदबा भोवताली सगळीकडे पसरला. पराक्रमी सासऱ्याचा उजवा हात झालेल्या धर्मशील सूनबाई!
असे या चमकत्या हिऱ्याला नकळत अनेक पैलू पडत गेले आणि तो अधिक लखलखत राहिला. कुशाग्र बुद्धीच्या सक्षम अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाला आकार देण्यात मल्हाररावांचा फार मोठा वाटा आहे. त्याकाळची सामाजिक स्थिती पाहता दूरदृष्टीने दिलेला मनःपूर्वक पाठिंबा आणि कर्तबगारीची विश्वासपूर्वक जडणघडण, हे विशेषत्वाने जाणवते.

इतक्या कर्तबगार स्त्रीला पती लाभला तो मात्र अतिशय सामान्य वकूब असलेला. व्यसनी, बेजबाबदार. खंडेराव हा सामान्य माणूस होता. आईवडिलांचा शब्द पाळावा, धर्मपत्नीशी धार्मिक संकेतानुसार वागावे, दैवाने वैभव दिले आहे तर मद्य आणि मदिराक्षींसोबत मौजमजा करावी हा त्याचा स्वभाव. खंडेरावात शौर्य नव्हते, धडाडी नव्हती, राजनैतिक दूरदृष्टी, धोरणे हे काहीही नव्हते. होळकरशाहीच्या इतिहासात त्याची प्रतिमा निर्माण झाली ती एका पराक्रमी पुरुषाचा कर्तृत्वहीन पुत्र म्हणून आणि एका सत्‌‍शील कर्तृत्ववान स्त्रीचा व्यसनी पती म्हणून!
अहिल्याबाईंना दोन मुले झाली. पुत्र मालेराव व कन्या मुक्ताबाई. पुढे लढाईत पती खंडेराव याचा मृत्यू झाला. त्यावेळच्या प्रथेनुसार धर्मशील अहिल्या सती जाण्यास निघाली. आत्यंतिक शोकमग्न अवस्थेतील मल्हाररावांनी हरप्रकारे विनवणी करून तिला सती जाण्यापासून रोखले. पित्यासमान सासऱ्यांची पायधूळ आदरपूर्वक मस्तकी लावून, वंदन करून त्या म्हणाल्या, ‘मी आपली मर्यादा उल्लंघन करणार नाही. कुरुक्षेत्रावर जसे भगवान श्रीकृष्णाचे शब्द अर्जुनाला, तसे आपले शब्द मजला.’ अहिल्येचे जीवितकार्य शेष होते म्हणून नियतीनेच जणू त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर त्या साध्वीचे अत्यंत साधे जीवन जगू लागल्या. धवल वस्त्र परिधान करून एकभुक्त मिताहारी राहून अधिकाधिक धार्मिक कार्यांसाठी त्या झटू लागल्या.

खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी आपल्या पुत्राचे स्थान सर्वार्थाने सुनेला दिले. मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्याबाई राज्यकारभारातील एकेक जबाबदारी स्वीकारू लागल्या. मल्हारराव सतत या ना त्या स्वाऱ्यांमध्ये गुंतलेले असत. त्यामुळे होळकर राज्याच्या मुलकी कारभाराचा जवळजवळ सगळाच भार अहिल्याबाईंवर होता. त्यांचा व्याप वाढत चालला, त्याबरोबरच दराराही. होळकरांच्या राज्यात आता मल्हाररावांनंतरचा मान अहिल्याबाईंचाच होता.
राज्यकारभारातील कित्येक आर्थिक जबाबदाऱ्या, तोफांसाठीच्या दारूगोळ्याचा कारखाना उभारण्यासारखी प्रचंड व्याप असलेली जबाबदारीची कामे, रयतेच्या तक्रारी, कुटुंबातील पेचप्रसंग, सुभेदारांमधील तिढे, आक्रमणांना सामोरे जाण्यासाठीची तयारी, पुण्याहून श्रीमंतांकडून येणारे आदेश, मसलती, सर्वच आघाड्यांवर त्या अत्यंत सतर्कतेने, अष्टावधान राखून, धोरण व कार्यतत्परता सांभाळून वावरत होत्या. त्यांची धडाडी व आवाका अवाक्‌‍ करणारा होता.
पतीप्रमाणेच त्यांचा पुत्र मालेराव यानेही त्यांची घोर निराशा केली. त्याला मार्गावर आणण्यासाठी अथक प्रयत्न करूनही त्याने अपयशच पदरी टाकले. अत्यंत अविचारी, उद्वेगी मालेरावाचे मानसिक संतुलन अतिशय अप्रिय घटनेमुळे बिघडले आणि बुडत्याचा पाय खोलात म्हणतात त्याप्रमाणे खोल गर्तेत गेल्यासारखा त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रांमध्ये कार्यकर्तृत्वाचे अमिट ठसे उमटवणाऱ्या अशा स्वयंपूर्ण व्यक्तिमत्त्वाला वैयक्तिक, कौटुंबिक जीवनात अशा दुःखांना सामोरे जावे लागावे हे दुर्दैवच. अनेक प्रकारचे पेचप्रसंग आणि लोकापवादही त्यांच्या वाट्याला आले. अगदी पोटच्या मुलाला विष दिले अशासारखेही. पण त्या खचल्या वा डगमगल्या नाहीत. खंबीरपणे त्यांना तोंड दिले. करारी वृत्ती आणि दरारा कायम ठेवला. त्यांचे सात्विकतेचे तेज आणि नेमस्त वागणे हेही दृष्प्रवृत्तींना दूर ठेवण्यात, आब आणि आदर कायम ठेवण्यास सहाय्यभूत होत असे.

राघोबादादांसारख्या मातब्बरांना संयतपणे चोख धडा शिकवणे असो वा वारसाच्या प्रश्नावर धोरणीपणाने निर्णय घेणे असो, तुकोजी होळकरांबाबत सततच्या आर्थिक समस्यांवर तोडगा काढणे असो वा महादजी शिंदेंसारख्या सुभेदारांबरोबर धोरणे आखणे असो किंवा श्रीमंताशी सल्लामसलत असो, सर्वत्र त्यांचे विचारीपण, तल्लख बुद्धी, दूरदृष्टी आणि ओजस्वीपण यांचे दर्शन घडत असे. त्यांना माणसांची पारख उत्तम होती आणि त्यांची चोख निवड त्या-त्या कामासाठी करून सुयोग्य मोबदला वेळच्या वेळी पोहोचता करण्याबाबतही त्या दक्ष असत. सर्वच क्षेत्रांत त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अजोड असेच होते.

अहिल्याबाईंनी ज्या क्षणी कारभार हाती घेतला तेव्हा देवाब्राह्मणांसमक्ष संपत्तीवर तुळशीपत्र ठेवले आणि प्रतिज्ञा केली-
‘माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत त्या मला पार पाडावयाच्या आहेत.’ इतक्या निर्लेप, निस्पृह आणि निरलस वृत्तीने तत्त्वनिष्ठपणे राज्यकारभार करणारा राज्यकर्ता मिळणे हे जनतेचे भाग्यच होय.

अहिल्याबाईंच्या दानधर्माची कीर्ती सर्वदूर पसरली होती. कोणाला रयतेसाठी काही करावेसे वाटल्यास ती व्यक्ती महेश्वराच्या दिशेने मार्गस्थ होत असे. सगळी शहानिशा करून त्या-त्या कार्यासाठीची सर्वतोपरी व्यवस्था केली जात असे. त्यांचे जनकल्याणकार्य दूरदूरच्या राज्य-प्रांतांपर्यंत विस्तारलेले होते. अयोध्या, उज्जैन, काशी, केदारनाथ, कोल्हापूर, गंगोत्री, चित्रकूट, जगन्नाथपुरी, जेजुरी, देवप्रयाग, त्र्यंबकेश्वर, द्वारका, नाशिक, परळी, पशुपतेश्वर, पंढरपूर, पैठण, प्रयाग… अशा विविध ठिकाणी मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे, रस्ते, विहिरी, तळी, वार्षिक दानव्यवस्था अशा अनेक स्वरूपात हे कल्याणकार्य घडत गेले. म्हैसूर राज्यात दुष्काळ पडला होता. त्यात हजारो लोक तहान-भुकेने मृत्युमुखी पडले. अहिल्याबाईंनी तिथून शेकडो विणकरांना आणून महेश्वरमध्ये सुस्थापित केले. त्यांना रोजगार, आर्थिक साहाय्य, राहण्यासाठी घरे दिली. महेश्वरच्या किल्ल्यात हातमाग आणवले आणि विणकरांना तिथे वस्त्र विणण्यास प्रोत्साहित केले. आज याच महेश्वरी साड्या भारतभर प्रसिद्ध आहेत. अहिल्याबाईंचा कनवाळूपणा आणि दातृत्वाची अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांच्या कार्याची व्याप्ती बघून स्तिमित व्हायला होते.
अहिल्याबाईंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःचे मोठे ग्रंथागार उभे केले होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून त्या निरनिराळे ग्रंथ मागवत असत. प्रसंगपरत्वे यातील निरनिराळ्या ग्रंथांचे ब्राह्मण वाचन करीत असत आणि अहिल्याबाई श्रवण करीत असत. तेव्हा भोवताली महेश्वरची रयतही असे. मोठा ग्रंथसंग्रह असलेल्या महेश्वरात विद्वान ब्राह्मणांचे अध्ययनासाठी नेहमी येणे होई.

अशा पावन भूमीला भेट देता आली, वंदन करता आले याचे फार समाधान वाटते. जनमानसात अहिल्याबाईंचे स्थान जसे अढळ आहे तसेच त्यांच्या अजोड व्यक्तिमत्त्वाने अनेक कविजनांचे मन प्रभावित झाले होते. कवी मोरोपंतांनी त्यांच्यावर रचलेल्या आर्या, शाहीर प्रभाकरांचा पोवाडा, इतकेच नव्हे तर एका इंग्रज कवयित्रीने लिहिलेले सुंदर काव्य याची साक्ष देतात. सती अहिल्येच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने घडलेली ही स्मरणयात्रा…