राजधानी पणजीत धो-धो; प्रमुख रस्ते गेले पाण्याखाली

0
12

राजधानी पणजीमध्ये गुरुवारी दुपारी पडलेल्या जोरदार पावसामुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात पावसाचे पाणी तुंबल्याने तारांबळ उडाली. शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय झाली. पणजीत गुरुवारी दुपारपर्यंत २.३२ इंच पावसाची नोंद झाली, अशी माहिती येथील हवामान विभागाने दिली.

महानगरपालिका क्षेत्रातील १८ जून रस्ता, पाटो, मिरामार, कांपाल, करंजाळे, मळा, कदंब बसस्थानक आदी विविध भागातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालक व नागरिकांची बराच वेळ गैरसोय झाली. शहरातील काही दुकानांत पावसाचे पाणी घुसले. अनेक भागांतील रस्त्यांवर सुमारे तास-दीड तास पावसाचे पाणी साचून राहिले होते. पणजीत संध्याकाळच्या सत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले. ताळगाव करंजाळे येथील कामत रिवेरा इमारतीची संरक्षक भिंत जोरदार पावसामुळे कोसळली.

पणजीनंतर मुरगाव येथे जोरदार पाऊस पडला. त्याठिकाणी दुपारपर्यंत १.८३ इंच पावसाची नोंद झाली. जुने गोवे येथे दुपारी जोरदार पाऊस पडला. त्या ठिकाणी १.१० इंच पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाने दिली. येथील हवामान विभागाने राज्यात चार दिवस पावसाची जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मच्छिमारांनी पाच दिवस समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे. राज्यात चोवीस तासांत १.४८ इंच पावसाची नोंद झाली असून, काणकोण येथे सर्वाधिक २.८६ इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे २.५५ इंच, केपे येथे २.२५ इंच, पेडणे येथे २ इंच, दाबोळी येथे १.५२ इंच, सांगे येथे १.५० इंच पावसाची नोंद झाली.