राजधानीतील पदपथ होणार माल विक्रेत्यांपासून मुक्त

0
129

पणजी शहरातील पदपथांवर बसून मालाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना तेथून हटवण्यासाठी पणजीच्या उपमहापौर लता पारेख यांच्या नेतृत्वाखाली एका कृती दलाची स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल दिली. मात्र पारेख या सध्या व्यस्त असल्याने कृती दलाचे काम सुरू होऊ शकले नाही. मात्र, येत्या दोन-चार दिवसात पणजीतील पदपथांवरील सर्व विक्रेत्यांना हटवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे फुर्तादो यांनी सांगितले.

पानपट्टीवाल्यांवर परराज्यांतून आलेल्या विविध विक्रेत्यांनी शहरातील पदपथांवर उच्छाद मांडला असल्याचे सांगून या लोकांना ताबडतोब पदपथांवरून हटवून पदपथ मोकळे करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे फुर्तादो यांनी स्पष्ट केले.
काल आपण स्वत: जाऊन कामत हॉटेलजवळील पदपथावर बसून पानपट्टी विकणार्‍या दोघा विक्रेत्यांना तेथून हटवल्याचे ते म्हणाले. हे विक्रेते फूटपाथवर कचरा करतात. हा कचरा गटारात जात असल्याने गटारे बुजतात व पावसाळ्यात शहरात पूर येत असल्याचे फुर्तादो यांनी नमूद केले. पानपट्टी खाऊन रस्त्यांवर थुंकणे, इमारतींच्या कोपर्‍यात थुंकणे असे प्रकार सध्या वाढले आहेत. पणजी महापालिकेच्या मार्केट प्रकल्पात पानपट्टी खाऊन भिंतीवर थुंकणे चालू असून त्यामुळे भाजी मार्केट इमारत अत्यंत घाणेरडी बनली असल्याचे फुर्तादो म्हणाले. पणजी शहरातील पदपथांवर बसून यापुढे कुणालाही मालविक्री करता येणार नसल्याचे ते म्हणाले.