राजदचे उत्तराधिकारी तेजस्वी यादव

0
9

>> पक्षाच्या बैठकीत लालूप्रसाद यादवांची घोषणा

राष्ट्रीय जनता दलाच्या दिल्लीत सुरू झालेंल्या दोन दिवसांच्या बैठकीत पहिल्या दिवशी पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी माझ्यानंतर माझा धाकटा मुलगा आणि बिहारचा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, हाच पक्षाचा नेता असेल. पक्षांतर्गत जे काही निर्णय होतील, ते सर्व निर्णय तेजस्वीच घेईल’, अशी घोषणा केली.

लालूंच्या या वक्तव्यानंतर पक्षाचे नेतृत्व पूर्णपणे तेजस्वी यांच्या हातात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीच्या या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीनंतर पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी आपला धाकटा मुलगा तेजस्वी यादव, हा आपला उत्तराधिकारी असेल अशी घोषणा केली. त्यामुळे आता फक्त तेजस्वी यादवच पक्षाशी संबंधित महत्त्वाच्या किंवा धोरणात्मक विषयांवर बोलतील.

दरम्यान काल रविवारी झालेल्या बैठकीनंतर आज सोमवारी १० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. यामध्ये लालूप्रसाद यादव यांना राष्ट्रीय जनता दलाचे १२ व्यांदा बिनविरोध अध्यक्ष होण्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चा झालेले ठराव परिषदेत मंजूर केले जातील.

या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पक्षाचे कार्याध्यक्ष बनवले जाऊ शकते. तेजस्वी यादव यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दिला होता, मात्र जगदानंद सिंह बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.