आजच्या घटस्थापनेच्या पवित्र दिवसापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत. विशेषतः पक्षांतरांचे छुपे मनसुबे बाळगणारी नेतेमंडळी आता उघडपणे नव्या दिशा धुंडाळू लागतील. आधी आम आदमी पक्ष आणि आता तृणमूल कॉंग्रेसच्या आगमनामुळे गोव्यातील ‘उपेक्षित’ आणि ‘इच्छुक’ अशा दोन्ही प्रकारच्या राजकारण्यांपुढे नव्या सुसंधी उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. ‘आप’ सारख्या पक्षापाशी पैसा आहे, संघटनही आहे, पण चांगल्या उमेदवारांची वानवा आहे. तृणमूललाही आयते उमेदवार हवे आहेत. आणि त्यामुळेच वरील दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसाठी तेथे संधींची शक्यता आहे. त्याचा फायदा उठवत विविध पक्षांमधील ‘असंतुष्ट’ नेते आपापली खुंटी हलवून बळकट करण्यामागे लागलेले दिसतात.
लुईझिन फालेरोंपाठोपाठ कॉंग्रेसला रामराम करून चालते होण्याची भाषा करीत आलेल्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी अखेर आपल्या वाढदिनी पक्षांतर न करण्याचा निर्णय जाहीर केल्याने कॉंग्रेसच्या स्थानिक श्रेष्ठींच्या जिवात जीव आला. बाहेरचा रस्ता धरलेल्या किमान एका नेत्याला थोपवून धरल्याचे श्रेय ह्या श्रेष्ठींच्या पदरी पडले आहे. आलेक्स रेजिनाल्ड यांना कॉंग्रेस पक्षात महत्त्वाचे पद दिले जाईल अशी ग्वाही विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांना दिली आहे. अर्थात, आलेक्स रेजिनाल्ड त्या पदासाठी पक्षांतरापासून परावृत्त झालेले नाहीत. कॉंग्रेसने स्वतंत्रपणे न लढता अन्य पक्षांशी युती करण्याची तयारी दर्शवलेली असल्याने अशावेळी पक्षांतर करणे योग्य होणार नाही हे उमगल्यानेच त्यांनी वेळीच आपले पाऊल मागे घेतले आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षातील असंतुष्ट आत्मा मायकल लोबो यांनीही आपली पत्नी शिवोलीतून अपक्ष लढणार असल्याचे घोषित करून आपल्या पक्षालाच अप्रत्यक्षपणे ललकारलेले दिसते. नुकत्याच केलेल्या दिल्लीवारीमध्ये भाजप श्रेष्ठींकडून डिलायला लोबो यांना पक्षाची उमेदवारी मिळणार नसल्याचे रोखठोकपणे सांगण्यात आल्यानेच त्यांच्यावर आपली वैयक्तिक ताकद दाखवून देण्याची ही वेळ आलेली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास सर्वच पक्षांमध्ये यावेळी उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे आणि त्याची परिणती म्हणून प्रत्येक मतदारसंघात बंडाळीचे कमीअधिक वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपले सरकार बळकट बनवण्यासाठी करविलेल्या घाऊक पक्षांतराचा परिणाम अटळपणे स्थानिक निष्ठावंत नेत्यांच्या असंतोषात झालेला दिसतो आहे. ही बंडखोरी पक्षश्रेष्ठी कशी आणि किती थोपवून धरतात त्यावर पक्षाची विविध मतदारसंघांतील कामगिरी अवलंबून असणार आहे.
कॉंग्रेसची स्वबळाची खुमखुमी तृणमूल कॉंग्रेसच्या आगमनानंतर निवळली आहे. समविचारी पक्षांशी किमान हातमिळवणीची तयारी पक्षश्रेष्ठींना दर्शवावी लागली. अर्थात मोठा गाजावाजा करीत वावरणारा आम आदमी पक्ष ह्या प्रस्तावित विरोधी एकजुटीत सामील होणार का हे अद्याप स्पष्ट नाही. आप नेते अरविंद केजरीवाल गोव्यात येणार आहेत, तेच ह्याचा उलगडा करू शकतील. तृणमूल कॉंग्रेस सर्व मतदारसंघांतून उमेदवार उभे करणार असल्याचे म्हणत असला तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गोव्यात आला असाल तर स्वतंत्रपणे लढल्याने ते कसे साध्य होईल ह्याचे उत्तर त्या पक्षाच्या नेत्यांनी द्यावे लागेल.
तूर्त राज्यात विरोधी पक्षांची संख्या उदंड झाल्याने भाजप नेते त्याला खतखतें म्हणत हिणवत जरी असले, तरी प्रत्यक्षात आपण घाऊकपणे आयात केलेल्या मंडळींमुळे स्वपक्षात मतदारसंघनिहाय निर्माण झालेल्या खतखत्याकडे त्यांनी आधी लक्ष द्यावे. विरोधी पक्ष एकजुटीने लढले तर ह्यावेळी खैर नाही याचे भानही ठेवावे लागेल.
‘स्वयंपूर्ण गोवा’, ‘सरकार तुमच्या दारी’ सारख्या उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत जाण्याचा खटाटोप सध्या भाजप सरकारने चालवलेला आहे. परंतु ह्याला मुळात खूप उशीर झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारी नोकरभरतीचे गाजर दाखवून जनता भुलत नसते. जो थोडथोडका काळ हाताशी उरला आहे, त्यामध्ये स्वतःप्रतीचा दृढ विश्वास सरकारला निर्माण करावा लागेल. रस्त्यांवरील खड्डे मिटवण्याची घोषणा, सरकारी कर्मचार्यांना बायोमेट्रिक सक्ती अशी वरवरची मलमपट्टी पुरेशी नसेल. आगामी निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थितीतील कडबोळे सरकार न येऊ देता स्थिर, विकासाभिमुख सरकार आपणच देऊ शकू हे जनतेला पटवून देता आले पाहिजे. निवडणुकीचे वारे आजपासून खर्या अर्थाने वाहू लागेल. कोण कुणीकडे उडून जाते ते पाहूयाच!