हडफड्यातील घटना
हडफडे बार्देश येथील सॉल्ट रेस्टॉरंटसमोरील रस्त्यावर आपापसांत झुंजणाऱ्या भटक्या गुरांची जोरदार धडक बसल्याने सोरांटोवाडा- हणजूण येथील रायन जोसेफ ज्युड आल्मेदा (45) या तरुण दुचाकीचालकाचा नाहक बळी गेला.
सविस्तर माहितीनुसार रायन आल्मेदा हा हडफडे येथून हणजूणच्या दिशेने येत असता येथील सॉल्ट रेस्टॉरंटच्या समोरील रस्त्यावर झुंजीत दंग असलेल्या भटक्या गुरांची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. बैलांची धडक बसल्यानंतर रायनच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची (जेएच 01 बीटी 5645) जोरदार धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी तात्काळ धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील रायनला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रायनला मृत घोषित केले.
दरम्यान, पंचायतींनी रस्त्यांवर खुलेआम भटकणाऱ्या आणि वेळप्रसंगी झुंजणाऱ्या भटक्या जनावरांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक पंचायत मंडळ तसेच सरकारने यावर ठोस उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात येत आहे.