रसरंग उगवेच्या ‘इनफिल्ट्रेशन’ नाटकास प्रथम पारितोषिक

0
15

>> कला अकादमीच्या अ गट मराठी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर; ‘एक रिकामी बाजू’ द्वितीय, तर ‘हँडस्‌अप’ तृतीय

कला अकादमीने आयोजित केलेल्या ५५ व्या ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, रसरंग उगवे या संस्थेने सादर केलेल्या ‘इनफिल्ट्रेशन’ या नाटकास १ लाख रुपयांचे पहिले बक्षीस प्राप्त झाले. बांदिवडे-फोंडा येथील श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज संस्थेच्य ‘एक रिकामी बाजू’ या नाट्यप्रयोगास ७५ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक, तर हसापूर-पेडणे येथील सातेरी कला मंदिर संस्थेच्या ‘हँडस्‌अप’ या नाटकाला ५० हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले.
तसेच पाळी-सुर्ला येथील अभय थिएटर अकादमी गोवाच्या ‘इथर’ व कलांगण मडगाव यांच्या ‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकास प्रत्येकी २५ हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली आहेत.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक नीलेश महाले यांना ‘इनफिल्ट्रेशन’ या नाटकासाठी प्राप्त झाले असून, सुशांत नायक याना ‘एक रिकामी बाजू’ नाटकासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. तृतीय पारितोषिक ‘इथर’ नाटकासाठी अभय जोग यांना देण्यात आले.

पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी अमोघ बुडकुले यांना ‘एक रिकामी बाजू’ नाटकातील भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक, तर गौतम गावडे यांना ‘इथर’ नाटकातील भूमिकेसाठी द्वितीय बक्षीस जाहीर झाले. अभिनयासाठीची प्रमाणपत्रे विराज नाईक, रोवेश शेलार, प्रथमेश केरकर, वर्धन कामत, अभिषेक नाईक, अश्वेक देसाई, शंकर नाईक, दादू पार्सेकर, सुरेश नाईक, व गजानन नार्वेकर यांना दिली जातील.

स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी डॉ. वेदिका वाळके यांना ‘इनफिल्ट्रेशन’ नाटकातील भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक, तर डॉ. संस्कृती रायकर यांना एक रिकामी बाजू नाटकातील भूमिकेसाठी द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रमाणपत्रे अनुजा पुरोहित, अंकिता गवस, निवेदिता चंद्रोजी, श्रावणी नायक, ममता शिरोडकर, अर्पिता गवस, गौरवी नाईक, संपदा गावस, श्रुती जांभळे व मनिषा हरमलकर यांना दिली जातील.

उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक कलानंद कामत बांबोळकर यांना, तर देवराज माजिक यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रकाशयोजनेसाठी डॉमनिक डिकॉस्टा यांना पारितोषिक, तर हर्ष मळीक यांना प्रमाणपत्रक दिले जाईल. वेषभूषेसाठीचे बक्षीस वैशाली आमोणकर यांना, तर प्रमाणपत्रक समिक्षा सावंत यांना देण्यात येईल. उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे पारितोषिक विनोद च्यारी यांना, प्रसाद शिंके यांना प्रमाणपत्रक मिळेल. रंगभूषेचे पारितोषिक एकनाथ नाईक यांना, खुशबू कवळेकर नायक यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्वतंत्र नाट्यसंहिता लेखनाचे प्रथम पारितोषिक डॉ. प्रकाश वजरीकर यांना ‘इनफिल्ट्रेशन’ नाटकासाठी देण्यात येईल, तर द्वितीय पारितोषिक मिलिंद बर्वे यांना ‘अहिंसा परमो धर्मः’ या नाटकासाठी दिले जाईल. खास स्पर्धेसाठी नाट्यसंहिता अनुवादनाचे पारितोषिक वर्धन विजयकुमार कामत यांना ‘बिहाइंड द एट बॉल’ या नाटकासाठी देण्यात येईल.

या स्पर्धेत विविध संस्थांकडून एकूण १७ नाटके सादर झाली. या स्पर्धेचे परीक्षण सुरेश खानविलकर (मुंबई), रमेश कदम (कल्याण) व चंद्रशेखर फडणीस (कोल्हापूर) या परीक्षक मंडळाने केले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.