मनोहर विमानतळावरून मिळणार कदंबची सेवा

0
8

>> उद्यापासून तासागणिक धावणार इलेक्ट्रिक बसेस; सरव्यवस्थापकांची माहिती

मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवार दि. ५ जानेवारीपासून सुरू असून, या विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांच्या सेवेसाठी कदंब महामंडळातर्फे ४९ आसनांच्या इलेक्ट्रिक बसेस रुजू करण्यात येणार आहेत, अशी माहिती कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मोप विमानतळ व्यवस्थापनाने आम्हाला विमानांच्या आगमन-निर्गमनाची कल्पना दिली असून, पहिल्या दिवशी ११ ते १२ विमाने येणार असून, तेवढीच विमाने परतणार आहेत. पहिले विमान सकाळी ९ वाजता येणार असून, कदंब बसेस सकाळी ९.३० वाजल्यापासून सेवेत रुजू होणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तासागणिक बसेस सोडण्यात येणार आहेत. विमानतळ व्यवस्थापनाने सूचित केल्याप्रमाणे दि. ३१ जानेवारीपासून दरदिवशी सुमारे ३४ विमाने येणार असून, तितकीच विमाने परत जाणार आहेत. त्यानुसार अधिक मागणी असल्यास आम्ही बसेसची संख्या वाढवणार आहोत, असेही संजय घाटे यांनी सांगितले.

पणजी, म्हापसा, कळंगुट आणि मडगाव या मार्गावर अर्ध्या तासाच्या अंतराने बसेस सोडण्यात येतील. सुरुवातीच्या आठ दिवसांत परिस्थिती पाहून आणि विमानांची संख्या वाढल्यास बसेसची संख्या वाढवण्यात येईल, असे घाटे यांनी पुढे सांगितले.

बसेसचा मार्ग आणि तिकीट दर
मडगाव ते मोपा व्हाया पणजी – ५०० रुपये
मोपा ते पणजी व्हाया म्हापसा – २५० रुपये
मोपा ते सिकेरी व्हाया कळंगुट – २५० रुपये
मोपा ते म्हापसा – २०० रुपये