रशियाची अर्थ व्यवस्था ढासळल्याने पर्यटकांच्या संख्येत घट: पर्यटनमंत्री

0
111

रशियाची अर्थव्यवस्था खालावल्यानेच यंदा राज्यात रशियन पर्यटकांचा आकडा कमी झाल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल सांगितले. रशियाची अर्थव्यवस्था खालावल्यानेच रशियन पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवलेली असून या परिस्थितीत त्यांनी गोव्यात यावे यासाठी सरकार काहीही करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रशियन रुबेल कधी नव्हे एवढा घसरलेला असून या परिस्थितीत रशियन पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येण्याच्या स्थितीन नसल्याचे परुळेकर म्हणाले.दरम्यान, ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ म्हणजेच गोव्यात येताच व्हिसा या योजनेमुळे राज्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांचा आकडा वाढू लागलेला असून या योजनेचा रोज ३५ ते ४० पर्यटक लाभ घेऊ लागलेले असून हा आंकडा आणखी बराच वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. ही सुविधा सुरू होवून सध्या २० दिवसच झाले आहेत. श्रीपाद नाईक हे केंद्रीय पर्यटन मंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली होती. पर्यटकांनी आपल्या देशांतून ऑनलाईन व्हिसासाठी अर्ज केला की भारतात येताच त्यांना विमानतळावर उतरल्यानंतर ही व्हिसा सुविधा मिळते. ही व्यवस्था झाल्याने पर्यटक खूष असून विदेशातून गोव्यात येणार्‍या पर्यटकांची चांगली सोय झाल्याने राज्यात पर्यटकांचा आंकडा वाढू लागला आहे. त्यामुळे रशियन पर्यटकांचा आंकडा कमी झालेला असला तरी अन्य देशांतून येणार्‍या पर्यटकांचा आंकडा मात्र व्हिसा ऑन अरायव्हलमुळे वाढला असल्याचे परुळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.