रशियन प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त ः ७१ ठार

0
86

रशियाची राजधानी मॉस्को शहराच्या सीमेनजीक काल एक प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्यातील सहा कर्मचार्‍यांसह सर्वच्या सर्व ७१ जण ठार झाले. या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

मॉस्कोतील दोमोदेदोवो विमानतळावरून सारातोव एअरलाईन्सच्या या विमानाने उड्डाण केले होते. मॉस्कोहून ते ओरस्क येथे जात होते. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर ते विमानतळापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावरील रामेन्स्कोये येथे दुर्घटनाग्रस्त झाले. तेथील बर्फाच्छादित भागात विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरले असल्याचे एका स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीने म्हटले आहे.

या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी रशियाच्या हवाई वाहतूक खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की हवामान, मानवी चुकीची शक्यता गृहीत धरून कारणाची पडताळणी केली जात आहे.