राज्यात कोरोना विषाणूमुळे काल रविवारी आणखी १४ जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित नव्या ४२० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४४८२ एवढी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २९२८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ टक्के एवढे आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६२,४६८ एवढी झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ५८१ जण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,५४,६५८ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. इस्पितळातून काल डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५७ एवढी आहे. तर काल नव्याने इस्पितळात ५० जणांना भरती करण्यात आले.
काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ३००२ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ३७० जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर ५० नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.
१४ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. मात्र राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १२ जणांचा, तर उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एकाचा आणि मडगावच्या हॉस्पिसियू इस्पितळात एकाचा मृत्यू झाला आहे.
रुग्णसंख्या घटली
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या फोंड्यात असून ती ४६६ एवढी आहे. मडगावात सध्या ३४७ रुग्णसंख्या असून पणजी २५५, चिंबल २६८, पर्वरीत १४३, कांदोळी १६२, कासावली १५५, कुठ्ठाळी १२६, पेडणे १६२, वास्को १४४, कुडचडे १०८, साखळी १९०, लोटली १२४, म्हापसा १०२, खोर्ली १५६, वाळपई १२३ अशी सध्याची रुग्णसंख्या आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या २७,५२१ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. आतापर्यंत १,११,४७६ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ८,६८,१३५ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. परराज्यातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.