रविवारच्या ‘मन की बात’वर शेतकरी बहिष्कार घालणार

0
214

कृषी कायद्याविरोधातील शेतकरी गेले २६ दिवस आंदोलन करत आहेत. सरकारकडून शेतकर्‍यांशी चर्चेचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या प्रश्नांवर काहीही तोडगा निघत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांनी आपले आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात तब्बल ४१ शेतकर्‍यांनी आतापर्यंत आपले प्राण गमावले आहेत. शेतकर्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात हा कार्यक्रम २७ डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधानांचे हे भाषण ऐकण्यास मात्र शेतकरी आंदोलक तयार नाहीत. ‘मन की बात’ सुरू असताना हे शेतकरी थाळी वाजवत आपला निषेध व्यक्त करणार आहेत. जोपर्यंत पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम सुरू असेल तोपर्यंत थाळी वाजवावी’ असे आवाहन जनतेला केले आहे.

दरम्यान, आंदोलन सुरू केल्यापासून आत्तापर्यंत ४१ आंदोलकांचा मृत्यू झाला असून रविवारी शेतकर्‍यांनी या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. एक दिवस भारत बंद व एक दिवस उपवासही शेतकर्‍यांनी केला आहे. आता शेतकर्‍यांकडून सोमवारपासून उपोषण सुरू केले असून शेतकर्‍यांकडून क्रमश: एक दिवसीय उपवास ठेवण्यात येणार आहे. सोमवारी एका ठिकाणच्या शेतकर्‍यांचा उपवास सुटल्यानंतर मंगळवारी नवा गट उपवास पाळणार आहे.

‘एक दिवस शेतकर्‍यांसाठी…’
दरम्यान, आज बुधवार दि. २३ डिसेंबर हा दिवस शेतकरी राष्ट्रीय किसान दिन म्हणून शेतकर्‍यांना समर्पित केला जातो. या दिवशी नागरिकांनी दुपारी आपल्या घरी जेवण न बनवता शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे, असे आवाहन शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलकांनी रालोआचे घटक असलेल्या खासदार, नेत्यांकडे आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याशीही आंदोलकांकडून संपर्क साधण्याता आला असून अण्णांनीही शेतकर्‍यांना समर्थन देणार असल्याचे सांगितले आहे. तर सरकारकडून आंदोलनकांसमोर पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ही चर्चा पुन्हा एकदा विज्ञान भवनातच आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्या दिवशी चर्चा व्हावी, याचा निर्णय शेतकर्‍यांनी घ्यावा असे कळवण्यात आले आहे.