रमेश तवडकरांची नाराजी दूर करणार

0
4

>> पुढील आठवड्यात बैठक; प्रदेशाध्यक्षांची माहिती

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती गोवा भाजप प्रदेश समितीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.

फर्मागुडी फोंडा येथे झालेल्या उटाच्या मेळाव्यात मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या भाषणामुळे सभापती रमेश तवडकर नाराज बनले आहेत. सभापतींचा मान राखला जात नाही, असे तवडकर यांचे म्हणणे आहे.

रमेश तवडकर हे काही गोष्टीवरून नाराज बनून प्रसंगी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांच्या तक्रारीवर पुढील आठवड्यात बैठक घेऊन चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आपण महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात व्यस्त असल्याने 18 नोव्हेंबरनंतर बैठक घेतली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून रमेश तवडकर यांच्या तक्रारींमध्ये लक्ष घालण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. संयुक्त बैठक घेऊन तक्रारीवर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.