
>>आयसीसी कसोटी क्रमवारी
>> विराट, विजय, शिखर, रोहितची घसरण
दक्षिण आफ्रिकेचा युवा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडा याने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळविले आहे.
भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या केपटाऊन येथे पहिला कसोटी सामना तसेच ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमधील सिडनी येथे झालेला ऍशेस मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी संपल्यानंतर आयसीसीने मंगळवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत भारताचा ७२ धावांनी पराभव केला होता.
रबाडाने या सामन्याच्या पहिल्या डावात ३४ धावांत ३ व दुसर्या डावात ४१ धावांत २ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या बळावर रबाडाने ५ गुणांची कमाई केली. सिडनी कसोटीत क्रमांक एकचा गोलंदाज म्हणून उतरलेल्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला पाच गुणांचा तोटा सहन करावा लागला. या सामन्यांपूर्वी अँडरसन व रबाडा यांच्यात ९ गुणांचे अंतर होते. आता रबाडाने अँडरसनची जागा घेतली असून दोघांत केवळ एका गुणाचे अंतर आहे. फलंदाजांमध्ये ९४७ गुणांसह पहिल्या स्थानी कायम आहे. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांना मागे टाकत द्वितीय स्थान मिळविले आहे. भारताच्या चेतेश्वर पुजाराची तिसर्यावरून पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. सिडनी कसोटीत केवळ एकदा बाद होताना १४१ धावा जमवल्याने रुटने आपल्या खात्यात २६ गुण जमा केले. केपटाऊन कसोटीत केवळ ३३ धावा जमवू शकल्याने कोहलीला १३ गुण गमवावे लागले. तर केनळ ३० धावा एकत्र केलेल्या पुजाराला २५ गुणांचा तोटा झाला.
कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळविणारा रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा सातवा गोलंदाज ठरला. ऑब्रे फॉल्कनर, ह्युज टेफिल्ड, पीटर पॉलोक, शॉन पॉलोक, डेल स्टेन व व्हर्नोन फिलेंडर यांनी यापूर्वी हे स्थान भूषविले आहे. रबाडाचा सहकारी फिलेंडर याने १२व्या क्रमांकावरून थेट सहावा क्रमांक मिळविला आहे. सामन्यांत ७५ धावांत ९ गडी बाद करत सामनावीर ठरलेल्या ३२ वर्षीय फिलेंडर याने आपल्या गुणांत तब्बल ६७ ची भर घातली. ‘टॉप २०’ बाहेरील खेळाडूंचा विचार केल्यास भारताचा भुवनेश्वर कुमार व ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स यांनी मोठी मजल मारली आहे. केपटाऊन कसोटीत ८७ धावांत ४ व ३३ धावांत २ गडी बाद करत भुवीने कारकिर्दीतील सर्वोत्तम २२वे स्थान मिळविले आहे. तर कमिन्सने सामन्यात ११९ धावांत ८ फलंदाजांना माघारी पाठवत २८व्या स्थानी उडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये हाशिम आमला व डीन एल्गार यांची घसरण झाली. प्रत्येकी तीन स्थानांच्या नुकसानासह ते अनुक्रमे १०व्या व १६व्या स्थानी पोहोचले आहेत. एबी डीव्हिलियर्लने मात्र पाच स्थानांची प्रगती साधत १३व्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर ऐडन मारक्रम व भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना केपटाऊन कसोटीचा अधिक फायदा झाला. मारक्रमने ४८वे (+ ६) व हार्दिकने ४९वे (+ २४) स्थान प्राप्त केले आहे. खराब कामगिरीचा सर्वाधिक फटका मुरली विजय, शिखर धवन व रोहित शर्माला बसला. मुरली विजय ३०व्या (-५), धवन ३३व्या (-३) तर रोहित ४४व्या (-३) स्थानी पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये उस्मान ख्वाजा, शॉन मार्श व मिचेल मार्श यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळविले आहे. १७१ धावा केलेल्या ख्वाजाने ५५ गुणांची प्राप्ती करत १९वा (+ ८), १५६ धावा चोपलेल्या शॉन मार्शने ४२ गुण कमवत विसावा (+ ११), तर त्याला कनिष्ठ बंधू मिचेलने १०१ धावांच्या बळावर ८ स्थानांची उडी घेत ५७वा क्रमांक मिळविला आहे. अष्टपैलूंमध्ये शाकिब अल हसन, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन पहिल्या तीन क्रमांकांवर कायम आहेत.