‘रथसप्तमी’- सूर्याची उपासना

0
1048
  •  अंजली आमोणकर

रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबर प्रतिमात्मक रथाचेही पूजन केले जाते. अरुण हा सूर्याचा सारथी आहे व तो एकचक्षु आहे. तो केवळ एका डोळ्यानेच पाहू शकतो. एकत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे हे गुण त्याच्याकडून शिकावयास मिळतात.

आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर रक्तचंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर … ‘ध्येयः सदा सवित्रमण्डल मध्यवर्ती….’- या मंत्राने ध्यान करून पूजा करतात.

हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे, असे मानले जाते. या दिवशीच्या पूजेत भक्ताने सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. लाल फूले, चंदन, कापूर अर्पण करुन छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. अशा पूजनाने समृद्धी प्राप्त होते, असा संकेत रूढ आहे. सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याचे पूजन करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून, ते उकळून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने उपवाससुद्धा केला जातो.

भारतातील सर्वच राज्यांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या रीतींनी साजरा होताना दिसतो. दक्षिण भारतात, वसंत ऋतुच्या आगमनाचा हा सण सूर्यपूजन करून साजरा केला जातो. समुद्र किनारी वसलेल्या गावांमध्ये या दिवशी ‘ब्रह्मोत्सव’ साजरा होतो. रथयात्रा काढली जाते. बंगालमध्ये या दिवसाला ‘भास्कर सप्तमी’ म्हणतात. उत्तरेत ही तिथी ‘जयंती सप्तमी’ व ‘अचला’ या नावांनी प्रसिद्ध आहे. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते. या समजुतीने दक्षिणेत ‘रथसप्तमी’ म्हणतात. शब्दकल्पद्रुमकारांनी माघ मासास ‘सामरी मास’ हे नाव दिले आहे. या तिथीला ते ‘माकरी सप्तमी’ असे म्हणतात. तसेच ‘सूर्य सप्तमी’, ‘भानू सप्तमी’ या नावांनीही ही सप्तमी ओळखली जाते. अनेक ठिकाणी सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवला जातो. भगवान् सूर्यनारायण रोज विश्‍वाला प्रकाश देत असतात. पण त्यासाठी त्यांची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्याच्या रथाला सप्त अश्व असतात. हे अश्‍व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात, प्रथम ध्यानमग्नता, नंतर नाममंत्रांसह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थ प्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांसाठी पुष्परथ, खेळ- स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाजजीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे.

रथसप्तमीच्या व्रताच्या ज्या अनेक कथा सांगितल्या जातात त्यात एक कथा अशीही आहे की कांबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला. तो जन्मतःच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिष्याला विचारले; तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली. याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल. तरच हा निरोगी होईल. राजाने ज्योतिष्याचा सल्ला ऐकून तसे केले तर त्याचा मुलगा निरोगी व सुखी झाला.

संपूर्ण चातुर्मास ग्रंथात आणखी एक वेगळीच कथा दिलेली आहे- ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, दुर्वा, फुलं आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या- देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं- ‘‘काय गं बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा’’. ‘‘तुला कशाला रे हवा वसा? उतशील- मातशील, घेतला वसा टाकून देशील’’. ब्राह्मण म्हणाला- ‘‘उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही’’. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘श्रावणमास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रांसहित) स्नान करावं. अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडल करावं. सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गाठी द्याव्या. पानफूल वहावं. पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा. सहा मास पाळावी. माघी रथसप्तमीला संपूर्ण करावं. गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकढं तूप- मेहूण जेवू घालावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी. ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं’’. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळी भिऊ लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं- ‘‘भिऊ नका, कापू नका. तुमच्या मुली आमचे येथे द्या.’’ ‘‘आमच्या मुली गरिबाच्या. दासी कराल, बटकी कराल.’’ राणी म्हणाली- ‘‘दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करु. प्रधानाची राणी करु.’’
मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं मुलींची लग्नं करून दिली. एक राजाचे घरी दिली. दुसरी प्रधानाचे घरी दिली. बारा वर्षांनी मुलींचा समाचार घ्यायला ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला; पाय धुवायला पाणी दिलं. ‘बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या.’ ‘गूळ खात नाही- पाणी पीत नाही- माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. ‘तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल’. ब्राह्मणाला राग आला. तो तडक तिथून उठला व दुसर्‍या मुलीकडे गेला. समान प्रश्नोत्तरे झाली. मुलगी म्हणाली- ‘तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू?’ घरात गेली. उतरंडीची सहा मोत्ये घेतली. तीन आपण घेतली. तीन बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून- खावून बाप घरी आला. बायकोने विचारले- ‘मुलींचा समाचार काय आहे?’ ‘जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्य्रात पीडते आहे. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे.’

इकडे जी बहीण दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं- ‘मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन, काही दिलं तर घेऊन ये.’ पहिल्या आदितवारी मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. प्रधानांच्या दासींनी त्याला पाहिला, विचारपूस केली व परसदारानं महाली घेऊन आल्या. मावशीनं न्याऊ- माखू घातलं, पितांबर नेसवलं, जेवू घातलं. कोहळा पोखरला व सोन्याच्या होन मोहरांनी भरून दिला. वाटेत सूर्यनारायण माळ्याच्या रुपानं आला व कोहळा काढून नेला. आईनं विचारलं, ‘मावशीनं काय दिलं?’ ‘मावशीनं दिलं होतं पण कर्मानं सर्व नेलं.’ दुसर्‍या आदितवारी दुसरा मुलगा गेला. दासीनं त्यालाही परसदारानी महाली नेला. त्याचाही चांगला पाहूणचार करून मावशीनं काठी पोखरून सोन्याच्या होन- मोहरांनी भरून दिली. सूर्यनारायण गुराख्याच्या रुपात आला व काठी काढून नेली. ‘दैवे दिलं ते कर्मानं नेलं.’ तिसरे आदितवारी तिसरा मुलगा आला. ह्या खेपेला मावशीनं नारळ पोखरून सोन्याच्या होन- मोहरांनी भरून दिला. घरी जाताना तो विहीरीत उतरला व नारळ गडगडून विहीरीत पडला. चवथ्या आदितवारी चौथ्या मुलाला मावशीनं शिदोरीत मोहरा लपवून दिल्या. वाटेत सूर्यनारायण कावळा बनून आले व शिदोरी पळवून घेऊन गेले. नंतर बहीण स्वतः आली व चौकशी करू लागली. प्रधानाच्या राणीनं- कहाणीचा वसा तिला सांगितला. तिनं श्रावणमासात तो वसा पूजला व राजास भाग्य आलं. छत्र-चामर घेऊन तो राणीस न्यावयास आला. वाटेत प्रत्येक मजलेस स्वयंपाक केल्यावर राणीनं ज्यांना ज्यांना कहाणी ऐकवली त्यांचे भले झाले. लाकूडतोड्याची मोळी सोन्याची झाली, माळ्याच्या विहीरीला पाणी लागलं, म्हातारीचे डोहात बुडालेला व सर्पानं खाल्लेला असे दोन्ही मुलगे जिवंत होऊन परतले. एका अपंगाला हातपाय आले. मग शेवटच्या मजलेस स्वतः सूर्यनारायण जेवावयास आले पण जेवणात राणीचा केस सापडून क्रोधीत झाले. ब्राह्मणाला, मोळीविक्याला, माळ्याला, प्रधानाच्या राणीला, अपंगाला, म्हातारीला जसे सूर्यनारायण पावले- तसे तुम्हा आम्हा पाऊ देत- ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

– भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने- विचाराने साजरा केला जातो. प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टीकोनही असतो. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपराना जसा भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टीकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे. वर्षभर सूर्योपासनेचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता- महासप्तमी; मस्तकावर बोरीची, रुईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता- माघसप्तमी; मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता- अचला सप्तमी… इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला आहे. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघस्नान असे काहींचे मत आहे. सर्व रोगांतून, पाशातून मुक्तता आणि सौभाग्य, धन, पुत्र इ.ची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले आहे. आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर रक्तचंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर … ‘ध्येयः सदा सवित्रमण्डल मध्यवर्ती….’- या मंत्राने ध्यान करून पूजा करतात. गोवर्‍यांवर, मातीच्या भांड्यात खीर करून तिचा नैवेद्य दाखवतात. सप्तधान्ये, सात रुईची पाने, सात बोरे सूर्याला वाहतात. अष्टांग अर्घ्य देतात. ब्राह्मणाला भोजन घालतात.
सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम्, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीत राजापूर तालुक्यात कशेळी गावांतील कनकादित्य या सूर्यमंदिराचा यात समावेश आहे. या मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी, सोमनाथ नजीकच्या प्रभासपट्टणम् क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते.

रथसप्तमी हा दिवस शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा व लोकांसाठी वसंत ऋतुची चाहूल घेऊन येणारा सण आहे.

महिलांचे हळदीकुंकू, लहान मुलांचे बोरन्हाणं व नव्या नवरीचे हलव्याचे दागिने घालून हळदीकुंकू… संक्रांत ते रथसप्तमी याच दिवसात साजरे केले जाते. या दिवशी श्रीसूर्य देवतेला श्रीनारायण स्वरुप म्हणजे श्री विष्णुस्वरुप म्हटले आहे. जो नित्य श्री सूर्यदेवाची पूजा करतो व रोज अर्घ्य देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदारिद्य्र दूर होते व तो सुखी होतो.
सूर्यग्रहणतुल्या तु शुक्ला माघस्य सप्तमी |
अरुणोदयवेलायां तस्यां स्नानं महाफलं ॥
माघ मासातली शुक्ल सप्तमी ही सूर्यग्रहणासमान पुण्यदायक सांगितली आहे. या दिवशी अरुणोदयी (सूर्योदयापूर्वी दीड तास) तिलयुक्त पाण्याने स्नान, पुढील मंत्र म्हणत करावे असे सांगितले आहे.

यदा जन्मकृतंपापं मया जन्मसृजन्मसु
तन्मे रोगं च शोकं च माकरु हंतु सप्तमी
सूर्याची नित्योपासना (ऋषीप्रमाणे नारायणाची उपासना सतत करतो), शिस्त (वेळेचे काटोकोरपणे पालन), त्याग (स्वतःजवळील तेज- उर्जा आणि चैतन्य स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता), व्यापकत्व (ब्रह्मांडातील विविध जिवांना सूर्य निरपेक्षपणे तेज-उर्जा आणि चैतन्य देत असतो) समष्टीभाव (सतत भ्रमण करून सर्व लोकांना समान रीतीने उर्जा व तेज देतो), ज्ञानदान (ज्ञान म्हणजे प्रकाश. सूर्याकडून सूक्ष्म अशा ज्ञानलहरी प्रक्षेपित होत असतात. कर्णाला सूर्यदेवता रोज ज्ञानदान देत असे- याचा महाभारतात अनेक ठिकाणी उल्लेख आहे; क्षात्रभाव (सूर्यदेवता इंद्राच्या अधिपत्याखाली असली तरीही इंद्राने अयोग्य निर्णय दिल्यावर ती त्याला विरोध करते आणि इंद्राच्या अयोग्य निर्णयांचे पालन करत नाही; समभाव (सूर्य सर्वच जिवांकडे समदृष्टीने पाहतो. तो गुणग्राहक आहे, त्यामुळे तो कोणावरही अन्याय करत नाही.) हे सर्व गुण वादातीत व मनुष्यप्राण्याला उत्तम मार्गदर्शन करणारे आहेत.

सूर्याच्या रथात सूर्य लोक- नक्षत्रलोक- ग्रहलोक- भुवलोक- नागलोक- स्वर्गलोक आणि शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबर प्रतिमात्मक रथाचेही पूजन केले जाते. अरुण हा सूर्याचा सारथी आहे व तो एकचक्षु आहे. तो केवळ एका डोळ्यानेच पाहू शकतो. एकत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे हे गुण त्याच्याकडून शिकावयास मिळतात.
‘आरोग्यं भास्करात् इच्छेत्’- म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी असे शास्त्रवचन आहे. या वचनाला स्मरून रथसप्तमीचे व्रत आपण सर्व करुया.