मुंबई येथील धि गोवा हिंदू असोसिएशनचे जुन्या पिढीतील बुजूर्ग कलाकार नटश्रेष्ठ रघुवीर नेेवरेकर (८६) यांचे काल मुंबईत निधन झाले. ते सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचे मामा होत.
धि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित ‘संशयकल्लोळ’ व अनेक संगीत नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. दूरदर्शनवरील ‘श्वेतांबरा’ या मालिकेतही त्यांनी काम केले होते. मुंबई आकाशवाणी केंद्राचे ते कलाकार होते. केंद्रावरून त्यांची अनेक कोंकणी नभोनाट्ये प्रक्षेपित झाली होती. ‘पोपेबाबाली मुंबय’ ‘जल्मगांठ’ व ‘कोडूलिंबू’ या त्यांच्या त्या काळातील कोंकणी एकांकिका मुंबईत बर्याच गाजल्या होत्या. ‘शाणू दादालो सोपो’, हा मुंबई आकाशवाणीवरील त्यांचा कार्यक्रम बराच गाजला होता.
नेवरेकर हे मूळ मडकई येथील. गोव्यात चौथीपर्यंत शिक्षण घेऊन ते मुंबईला गेले व विल्सन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी अभिनयास सुरुवात केली. ते मुंबईत स्थायिक झाले होते. नेवरेकर व्यवसायाने उद्योजक होते.
आकाशवाणीवरील ‘नभोनाट्य’च्या क्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोठे होते, असे कवी माधव बोरकर यांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळी १०.३० वा. माहीम येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल.