योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची उचलबांगडी

0
98

अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा फेटाळला
गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्यांना जबाबदार असलेले आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून उचलबांगडी करण्यात आली आहे. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आपचे ज्येष्ठ नेते कुमार विश्‍वास यांनी बैठकीनंतर दिली.दरम्यान, काल सकाळीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होण्याआधीच केजरीवाल यांनी अंतर्गत कलहाबाबत दु:ख व्यक्त करत पक्षाच्या निमंत्रकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा राष्ट्रीय कार्यकारिणीने फेटाळला आहे.
काल सुरू झालेल्या आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला निमंत्रक अरविंद केजरीवाल उपस्थित नव्हते. त्यांच्या गैरहजेरीत योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकारिणीच्या ११ सदस्यांनी यादव व भूषण यांना हटविण्याच्या बाजूने तर आठ जणांनी या निर्णयाच्या विरोधात मतदान केले. योगेंद्र यादव यांना पक्षाच्या प्रवक्तापदावरूनही हटविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रशांत भूषण म्हणाले की, यापुढे ते व योगेंद्र आपच्या राजकीय व्यवहार समितीचे सदस्य नसतील. मात्र, दोघेही पक्षात कायम राहणार आहेत. गेले काही दिवस आपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू असून त्यातच ज्येष्ठ नेत्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याने नवे वळण मिळाले आहे.