धेंपो-बगान लढत गोलबरोबरीत 

0
96

भारत एफसीचा स्पोर्टिंगवर विजय 

आघाडीवीर मोहन बगानला (कोलकाता) १-१ असे गोलबरोबरीत रोखून धेंपो स्पोटर्ंंस क्लबने हिरो आय लीग स्पर्धेंच्या नवव्या फेरीतील विजयाचे पूर्ण गूण विभागून घेतले.
येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाहुण्या मोहन बगानतर्फे बलवंत सिंह (३१वे मिनिट) तर धेंपोतर्फे कर्णधार कॅलम ऍग्नसने (८८वे मिनिट) गोल नोंदले.
सोनी नोर्डेला ‘रेड कार्ड’ देण्यात आल्याने पाहुण्या मोहन बगानला उत्तरार्धात दहा खेळाडूनिशी खेळावे लागले. पूर्वार्धाच्या मध्यावधीस बलवंत सिंहला गोल नोंदण्यास साथ दिलेल्या नोर्डेला मध्यंतराच्या ठोक्याला रेड कार्ड देत बाहेंर काढण्यात आलेे.धेंपोने उत्तरार्धात जोरकस खेळीत पाहुण्यावर दडपण आणले आणि खेळ संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना कर्णधार कॅलम ऍग्नसने नोंदलेल्या गोलवर बरोबरी साधली.
धेंपोचे हंगामी प्रशिक्षक मॉरिसिओ आफोन्सो यांनी ईस्ट बंगालविरुध्द खेळलेल्या संघात तीन बदल करताना दुखापतीतून सावरलेला कॅलम ऍग्नस, आल्विन जॉर्ज आणि होलीचरण नार्झरी यांना खेळविले. बगानचे प्रशिक्षक संजय सेन यानी एक बदल करताना विक्रमजीत सिंहच्या जागी सौविक चक्रवर्तीला उतरविले. धेंपोने प्रारंभापासून आक्रमक पवित्रा अवलंबिला पण नार्झरी आणि कॉस्टारिकन कार्लोस हेर्नांडेझ यांचे प्रयत्न हुकले. मोहन बगानच्या पुसा,, बलवंत आणि पिएर्रे यानीही सुंदर समन्वयात प्रतिहल्ले केले. २४व्या मिनिटाला पिएर्रेचा फटका बाहेर गेला पण ३१व्या मिनिटाला सोनी नोर्डेच्या पासवर बलवंतने पाहुण्याचा आघाडीचा गोल केला.
मध्यंतराच्या अंतिमक्षणात निर्मल चेत्रीला कोपराने ढोसल्याप्रकरणी पंचानी सोनी नोर्डेला रेड कार्ड देऊन बाहेर काढले.
उत्तरार्धात धेंपोने गोलसाठी जोरदार प्रयत्न केले पण बगानचा गोलरक्षक मजुमदारने हेर्नांडेझ, आल्विन, नार्झरीचे प्रयत्न थोपविले. अंतिमक्षणात कर्णधार कॅलम ऍग्नसने सुंदर व्हॉली फटक्यावर धेंपोचा बरोबरीचा गोल नोंदला. या अनिणिर्ंत लढतीअखेर मोहन बगानने नऊ सामन्यातील पंधरा गुणासह अग्रस्थान राखले तर धेंपो क्लबने आठ गूण जमविले.
भारत एफसीची स्पोर्टिंग क्लब  दी गोवावर मात
पुणे : दरम्यान, यजमान भारत एफसीने स्पोर्टिंग क्लब दी गोवाचा १-० असा पराभव करून नवव्या फेरीतील विजयाचे पूर्ण गुण प्राप्त केले.
बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात भारत एफसीचा एकमेव विजयी गोल मेहराजुद्दिन वाडूनने ६०व्या मिनिटाला नोंदला.
भारत एफसीने या विजयासह सात सामन्यातून ८ गुण जमविले तर स्पोर्टिंग क्लब ३ गुणावर राहिला.