>> गाभार्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय
अयोध्येत काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिराच्या गाभार्याचे भूमिपूजन संपन्न झाले. गाभार्याच्या पहिल्या शिळेचे मंत्रोच्चारासह योगींच्या हस्ते पूजन करण्यात आले. या भूमिपूजनासह मंदिराच्या निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चौथर्याचे बांधकाम करण्यात आले.
राम मंदिराच्या चौथर्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वाचे लक्ष राम मंदिराच्या गाभार्याकडे लागले होते. योगी आदित्यनाथ यांनी काल सुरुवातीला रामलल्लाची आरती केली. त्यानंतर निर्माणाधीन गर्भगृह स्थळी पुरोहितांकडून केल्या जाणार्या धार्मिक विधीत ते सहभागी झाले. वैदिक मंत्रोच्चारात योगींनी राम मंदिराच्या गाभार्याची पहिली शिळा ठेवली. त्यामुळे मंदिराच्या गाभार्याच्या कामाला सुरुवात आता वेग येणार आहे.
या गाभार्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. तसेच २०२४ मधील मकरसंक्रातीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची या गाभार्यात प्राणप्रतिष्ठा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक असणार आहे. या पार्श्वभूमीवर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.
गाभार्याचे भूमिपूजन झाल्याने आता राम मंदिराची उभारणी वेगाने होईल. राम मंदिर हे भारताचे राष्ट्रीय मंदिर असेल आणि ते भारताच्या एकतेचे प्रतीक असेल.
- योगी आदित्यनाथ,
मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश.