- डॉ. सीताकांत घाणेकर
वाईट घटनांवरच चिंता करत बसण्यापेक्षा त्यावर चिंतन करून त्यांचे विश्लेषण केले तर प्रत्येकाला तसेच मानवजातीला फायदा होईल. इतरांच्या चुका बघून आपण सुधारु शकू. विश्व काय करणार माहीत नाही पण प्रत्येक योगसाधक तरी संकल्प करु या.
लाखो वर्षांपासून कालचक्र चालू आहे. त्यांत तीन काळ आहेत- भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ. चालू काळ म्हणजे वर्तमानकाळ. क्षणाक्षणाने तो भूतकाळ होतो. आपण भविष्यकाळाच्या प्रतिक्षेत राहतो. तत्त्ववेत्ते सांगतात की मानवाने सुखी होण्यासाठी वर्तमानकाळात रहायला हवे. त्या त्या क्षणाचा अनुभव घ्यायला हवा. पण मानवी मन ते – ते थोडेच एका जागेवर राहणार! ते भूत व भविष्यकाळातच जास्त पळत असते. कारण आपले त्याच्यावर नियंत्रण नाही. त्यामुळेच या माकडमनावर नियंत्रणासाठी उत्कृष्ट शास्त्र म्हणजे योगशास्त्र.
भूतकाळ म्हणजे इतिहास- प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा, त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा, विश्वाचा. त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकला तर विविध चांगल्या- वाईट घटना लक्षात येतात. वाईट घटनांवरच चिंता करत बसण्यापेक्षा त्यावर चिंतन करून त्यांचे विश्लेषण केले तर प्रत्येकाला तसेच मानवजातीला फायदा होईल. इतरांच्या चुका बघून आपण सुधारु शकू.
आजचा काळ हा कोरोनाचा काळ म्हणून मानव इतिहासात कोरला जाईल. विरंगुळा म्हणून दूरदर्शनवर दोन पूर्वीच्या मालिका चालू आहेत- रामायण आणि महाभारत. ही दोन्हीही महाकाव्ये अत्यंत बोधदायक आहेत. रामायण महर्षी वाल्मिकींनी तर महाभारत महर्षी व्यासांनी लिहिले आहे. त्याच महाभारतात एक उत्कृष्ट ज्ञानदायी व मार्गदर्शक साहित्य मानवतेला मिळाले ते म्हणजे – श्रीमद्भगवद्गीता… स्वतः पूर्णावतार श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रावर अर्जुनाला निमित्त करून मानवतेला युगायुगांपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी गायिलेले गीत. त्यात तर प्रत्येक अध्यायात योगदर्शनच आहे.
आपण रामायण- महाभारत बघतो, गीता वाचतो पण काही बोध घेतो का? आपल्या विचारात व वागण्यात काही फरक आहे का? गीतेतील विचारांचा अभ्यास व चिंतन आपण करतो का? नसेल तर आयुष्य व्यर्थ आहे. अशा वेळी आद्य श्रीशंकराचार्यांचे चर्पटपंञ्जरिका स्तोत्र आठवते-
* दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः|
कालः क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्वत्याशावायु॥
भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते |
प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे ॥
– दिवस आणि रात्र, सकाळ-संध्याकाळ, शिशिर ऋतु, वसन्तऋतु पुनःपुनः येतात व जातात. याप्रमाणे कालाची क्रीडा चालत आहे आणि आयुष्य निघून जात आहे. परन्तु आशारूपी वायू हा पिंड (देह) सोडत नाही. हे मूढा! गोविंदाला भज, गोविन्दाला शरण जा, मृत्यु जवळ आल्यावर ‘डुकृञ्’ करणे – घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही.
– हा पहिलाच श्लोक आहे. एकूण १७ श्लोक आहेत. शंकराचार्यांचे हे स्तोत्र अत्यंत मार्गदर्शक आहे. रामायणात चांगल्या व वाईट दोन्ही घटना आहेत- * चांगल्या बोधप्रद –
– राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांचे अत्यंत अतूट, पवित्र बंधुप्रेम
– पिता महाराज दशरथ यांनी महाराणी कैकयी हिला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवले. तरीही रामाच्या मनात तिच्याबद्दल कुठेही राग नाही, द्वेष नाही. उलट क्षमाच. नम्रताच आहे.
– रामाचे एकपत्नी व्रत.
– वडील बंधूच्या पादुका सिंहासनावर ठेवून स्वतः वनवासी जीवन जगून राज्यव्यवस्था पाहणारा भरत तेवढाच मोठा आहे.
– रामाच्या प्रेमापोटी त्याच्याबरोबर स्वतःहून वनात जाणारा लक्ष्मण.
– रामायणातील महिला तर महानच आहेत- देवी सीता, मंदोदरी, उर्मिला (लक्ष्मणाची पत्नी).
– बिभीषणासारखा ज्ञानी रामभक्त.
– हनुमानाशिवाय रामायणाला गोडी नाही.
* वाईट पण तरीही बोधदायक …
– वेदशास्त्रपारंगत पण तरीही स्वार्थी, दुष्ट, विकार-वासनांच्या अधीन झालेला लंकापती रावण. त्याचा अहंकार तर क्षणोक्षणी जाणवतो.
– विचार न करता आपल्या पित्याचे समर्थन करणारे इंद्रजितासारखे रावणाचे पुत्र- अधर्माला साथ देणारे
– प्रत्यय समयी झोपेत असणारा, बुंधुप्रेमापोटी स्वतःचे बलीदान देणारा रावणाचा भाऊ कुंभकर्ण- (खरे म्हणजे रावणाचे वर्तन त्याला आवडले नव्हते. त्याची तो कानउघाडणीदेखील करताना दिसतो.)
– मंथरा? कैकयीची माहेरची दासी. मतपरिवर्तन करण्याची तिची पद्धतच महाभयंकर. सारे रामायण तर या दोन स्त्रियांमुळेच घडले.
– एका पवित्र पतिव्रता स्त्रीवर – सीतेवर अयोध्येच्या प्रजेने केलेले आरोप आणि तेही दोन वेळा. सज्जन व कर्तव्यकठोर व्यक्तीला अशा घटना असह्य होतात.
– अशा या रामायणातील थोड्या चांगल्या- वाईट गोष्टी. तीच गोष्ट महाभारताची!
महाभारतातील चांगल्या अनुसरणीय गोष्टी….
– पाच पांडवांचे परस्परांवर असणारे प्रेम, तसेच सावत्र भावांवरील प्रेम.
– युधिष्ठिराचे धर्मप्रेम व कर्तव्यनिष्ठा.
– कर्णाचे मित्रप्रेम
– श्रीकृणाचे सत्यधर्माला सहकार्य व संपूर्ण समर्पण
– मानलेल्या भगिनीवरचे (द्रौपदी) प्रेम व तिला ऐनप्रसंगी केलेली मदत.
– भीष्मांचा स्वार्थत्याग.
* वाईट पण धडा शिकवणार्या….
– कौरवांचा पांडवद्वेष
– शकुनीची सूडबुद्धी व खोटेपणा
– धर्मराजाचे द्यूतप्रेम व बुद्धिभ्रष्टता.
– भर सभेत द्रौपदीशी असभ्य वर्तन आणि तिच्याबद्दल अभद्र भाषा.
– कुंतीला विवाहापूर्वी झालेले अपत्य व त्यामुळे कर्णाला भोगावा लागलेला त्रास.
इथेही मुद्दे पुष्कळ आहेत. तासन्तास चर्चा करू शकतो असे… मते देखील विविध आहेत. पण मुख्य मुद्दा म्हणजे आपण काय शिकलो?
महाकाव्यांची मदत घेऊन कोरोनावरदेखील विचार करायला हवा कारण इथेही पुष्कळ घटना आहेत.
* चांगल्या घटना –
– विश्वातील सर्व राष्ट्रे एकत्र येऊन महामारीवर विचार व संशोधन करू लागली- औषधे व व्हॅक्सीन तयार करण्यासाठी.
– कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून नाका-तोंडावर ‘मास्क’ बांधणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे, बाहेर न थुंकणे, शिंक- खोकला आला तर तोंडावर रुमाल ठेवणे. स्वच्छता पाळणे, कपडे नियमित धुणे…. सारांश- थोडी शिस्त, आरोग्यासाठी थोड्या दक्षता.
– जनतेच्या सद्भावना दिसू लागल्या- त्यांना ‘हिरो वॉरीयर’ अशी नावे देण्यात आली- डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, वार्ताहर, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याची नोंद घेतली गेली. त्यांचे कौतुक केले गेले. अनेकांनी दान केले, धन, अन्न इ.
– रस्त्यांवरची वर्दळ, अपघात कमी झाले
– वातावरण साफ झाले. असे म्हणतात की गंगेचे पाणी स्वच्छ झाले. हिमालयाची शिखरे दुरून दिसू लागली.
– शिकविण्याच्या पद्धती ऑनलाईन सुरू झाल्या.
– मौजमस्ती, व्यसने यांच्यावर नियंत्रण आले
– सगळे कुटुंब घरी राहिले, एकमेकांना सहकार्य मिळाले.
– स्वावलंबन अंगिकारायला शिकलो. आयुष्यात कधीही न केलेली कामे जसे झाडू मारणे, भांडी घासणे, जेवण करणे… अशी कष्टाची कामे करायला शिकलो. माता-पिता-भाऊ-बहीणी एकत्र आले.
* नको असलेल्या घटना….
– लोक जिथे होते तिथेच अडकले. आपल्या गावी जाऊ शकले नाही
– नोकरी नसल्यामुळे पगार मिळाला नाही. अन्नपाण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागले.
– काही ठिकाणी डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांच्यावर अत्याचार झाले.
– सामाजिक कार्यकर्त्यांना स्वतःच्या घरी जाण्यास बंदी केली.
– मुलांवर अत्याचार वाढले. बीभत्स, कामोद्दीपक, लहान मुलांवर वाईट परिणाम करणारे कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवू लागले.
या सगळ्याबरोबरच रोग्यांची संख्या वाढणे, मृत्यू… या अत्यंत भयानक घटना आहेत. तसे घडणे साहजिक आहे. अशा या भुतकाळातील, वर्तमानकाळातील घटनांवर विचार करण्याचे कारण म्हणजे आपण चिंतन करायला हवे.
– आता भविष्यात काय? आपण कोणती पावले उचलणार जेणेकरून नकारात्मक गोष्टी घडू नयेत.
– विश्व काय करणार माहीत नाही पण प्रत्येक योगसाधक तरी संकल्प करु या.
– स्वतःचे आरोग्य ः शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक अशा सर्व पैलूंनी आपले आरोग्य सांभाळणार. त्यासाठी शास्त्रशुद्ध योगसाधना करणार. सत्य व नैतिकतेच्या रस्त्याने जाणार. भगवंताकडे प्रार्थना करणार व त्याप्रमाणे आचरण करणार.
* समानी व आकूतिः समाना हृदयानि वः |
समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति ॥
– तुमचे संकल्प एकसमान असोत. तुमची हृदये एक होवोत. तुमची मने एकसमान होवोत ज्यामुळे तुमचे परस्पर कार्य पूर्णपणाने संगठित होवो.
त्याचबरोबर देवाकडे मागणी करु या…..
* असतो मा सत् गमय | तमसो मा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा ऽ मृतं गमय | ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
– हे प्रभो तू मला असत्याकडून सत्याकडे ने, (अज्ञानरुपी) अंधःकाराकडून (ज्ञानरुपी) प्रकाशाकडे ने, मृत्युपासून अमरत्वाकडे ने. त्रिविध तापांची शांती होवो.