योगसाधना – ४५० अंतरंग योग – ३६

0
149
  •  डॉ. सीताकांत घाणेकर

सकाळी झोपेतून उठल्यावर भगवंत स्मृतिदाता असतो कारण झोपेत आम्हाला कसलीही स्मृती नसते. उठल्याबरोबर स्वतःबद्दल सर्व ज्ञान लगेच हजर होते. या स्मृती परत आल्यामुळेच आपले सर्व व्यवहार अगदी व्यवस्थित चालतात. म्हणून त्यासाठी प्रथम प्रहरी त्या भगवंताप्रति कृतज्ञता!

चित्तएकाग्रतेसाठी शास्त्रशुद्ध मूर्तिपूजेचा अभ्यास व चिंतन करता करता आपण अवधानासाठी (अटेन्शन) बाह्यस्थितीजन्य कारणांवर विचार करीत आहोत.
पू. पांडुरंगशास्त्री आठवले सहा कारणे सांगतात त्यातील पहिले म्हणजे उद्दीपकता- या विषयावर आपण सविस्तर विचार केलेला आहे.

आता दुसरे कारण बघुया.
२) पुनरावृत्ती – (रिपीटीशन)
आपण भगवंताची पूजा करतो, भजन म्हणतो त्यावेळी खरे म्हणजे संपूर्ण चित्त एकाग्रता असणे अपेक्षित आहे. पण मन चंचल असल्यामुळे व हे सर्व कर्मकांडात्मक केल्यामुळे मन भगवंतावर राहीलच याची खात्री नसते आणि असले तर छानच आहे. पण पूजेनंतर किंवा भजनानंतर आपण आपल्या रोजच्या व्यवहारात गुंततो. मग सबंध दिवस देवाची आठवणदेखील येत नाही. पण खरे म्हणजे मनाची चंचलता कमी करण्यासाठी व ताणतणावापासून थोडा वेळ मुक्ती मिळवण्यासाठी मधेमधे भगवंताकडे जुळणे म्हणजेच योग साधणे अत्यावश्यक असते. आता तर विश्‍वात समस्या – वैयक्तिक व सामाजिक इतक्या वाढलेल्या आहेत की अनेकांना विविध मानसिक रोग होताहेत. काहीजण तर तणाव सहन होत नाही म्हणून आत्महत्या करतात.

जसे एखादे लहान मूल काही समस्या आली तर आपल्या आईकडे धाव घेते आणि त्याला मनाची शांती मिळते. तसेच भगवंताशी जोडले गेल्यामुळे आपली आत्मशक्ती वाढते. पण फक्त संकट आले तरच देवाची आठवण करावी असे नाही तर दिवसरात्र जोडले जाणे आवश्यक असते. कारण त्यामुळे आपले अंतर्मन जे नव्वद टक्के आहे ते सतत देवाशी जुळले तर मनःशांती टिकून राहते. कारण परमात्मा तर सर्व समर्थ आहे. तो सत्यं- शिवं- सुंदरम् आहे.
जसा आपला मोबाइल सबंध दिवस वापरला तर डिस्चार्ज होतो व वेळोवेळी त्याची बॅटरी चार्ज करावी लागते. अगदी तशीच आत्मशक्ती अंतर्मनाला व आत्म्याला द्यावी लागते. त्यासाठीच पुनरावृत्ती गरजेची आहे.

शास्त्रीजी उदाहरणांसहित सांगतात –
* घड्याळाचा एखादा ठोका लक्षात येत नाही परंतु आठ- दहा ठोके पडतात किंवा गजर होतो तेव्हा त्याच्याकडे लक्ष गेल्याशिवाय राहात नाही.
* दरवाजाही दोन- चार वेळा ठोठावला जातो तेव्हा माणसाचे लक्ष जाते.
* पुनरावृत्ती ही अवधानाला कारण आहे.
आपण इतिहासातदेखील बघतो की जे गस्त घालणारे सैनिक असतात ते परत परत – दर एका तासांत ओरडत असतात- ‘होशियार ऽ ऽ’. मग बाकीचेदेखील त्यांना साद देतात. त्यामुळे एक म्हणजे सुस्त मन जागृत होते आणि झोपलेला असेल तर जागा होतो.
सारांश एकच- पुनरावृत्ती.
मूर्तिपूजेत आपण विविध स्थूल मूर्त्या वापरतो. त्यांच्याकडे वारंवार पाहिले पाहिजे. म्हणूनच आपण आपल्या कार्यालयातही देवाचे फोटो लावतो किंवा मूर्ती ठेवतो. तिथे आल्यावर लगेच उदबत्ती पेटवतो. थोडा वेळ प्रार्थना करतो. पण नंतर विसरतो. इथेसुद्धा वारंवार पाहणे आवश्यक आहे. मुख्य मुद्दा हा की कर्मकांडात्मक नको. आत्मा-परमात्म्याचे सूक्ष्म स्तरावर मीलन अपेक्षित आहे.

त्याशिवाय ज्या व्यक्ती खरेच भगवंताचे अस्तित्व सगळीकडे मानतात व त्यांना जाणीव होते की भगवंत माझ्या सर्व कर्मांचा- बर्‍या-वाईट, साक्षी आहे. आपण माणसांना फसवू शकतो पण त्या शक्तीला नाही. तसे पाहिले तर मूर्तीची/फोटोची गरजच नाही. कारण भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे तो आपल्या हृदयात वास करतो.
* सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टोः|
पण आपली बुद्धी अल्प असल्यामुळे एवढ्या सूक्ष्म जाणिवेत आपण जात नाही. म्हणूनच स्थूल वस्तूंची आम्हाला गरज लागते.
पू. पांडुरंगशास्त्री आपले लक्ष या विषयावर केंद्रीत करताना म्हणतात –
* म्हणून स्थूल मूर्ती (फोटो)सुद्धा घरात हवेत व त्याकडे वारंवार पाहात राहिले पाहिजे. भगवंताचे सकाळच्या काकड आरतीपासून रात्री झोपेपर्यंत दर्शन घेण्याचा महिमा वाढला त्याचे हेच कारण. कदाचित याच्यामुळे इस्लाम धर्मातही दिवसातून पाच वेळा नमाज पठणाची पद्धत पडली असावी.

स्वाध्याय परिवाराची त्रिकालसंध्या या अवधानाचे एक माध्यम मानले जाऊ शकते. त्रिकालसंध्या म्हणजे कर्मकांडात्मक आचमन वगैरे करून, गंध लावून श्लोक म्हणण्याचा विधी नाही तर दिवसातून तीन वेळा भगवंताची कृतज्ञतापूर्वक आठवण करणे आहे.

१) सकाळी झोपेतून उठल्यावर भगवंत स्मृतिदाता असतो कारण झोपेत आम्हाला कसलीही स्मृती नसते. उठल्याबरोबर स्वतःबद्दल सर्व ज्ञान लगेच हजर होते. मी कोण (नाव), पेशा…, आपले कुटुंब… काय कामं आहेत… थोड्याशा वेळातच सर्व स्मृती ज्ञात होतात.
शास्त्रीजी म्हणतात – * या स्मृती आल्या नाहीत तर विश्वात गोंधळ माजेल.
* आता ज्ञात झालेल्या या स्मृती होत्या तरी कुठे?
या स्मृती परत आल्यामुळेच आपले सर्व व्यवहार अगदी व्यवस्थित चालतात. म्हणून त्यासाठी प्रथम प्रहरी कृतज्ञता!
२) दुसरी भोजन करताना… शक्तिदाता म्हणून. आपण जेवतो, खातो पण त्याचे व्यवस्थित पचन कोणामुळे होते? रक्त कोण व कसे बनवतो? आपले शरीर कसे वाढते? आपल्याला शक्ती कशी मिळते?
खरे म्हणजे दर वेळी आपण खातो तेव्हा भगवंताची आठवण करणे सज्जनता आहे. पण निदान दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी तरी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. याच्याबरोबर हा विचार सुद्धा मनात यायला हवा की जे अन्न माझ्यासमोर येते ते बनवले कुणी? – शेतकर्‍याने कष्ट घेतले. पण पाऊस कुणी पाडला? रोपटे वाढवले कुणी? त्याला दाणे, फळे कुणी दिली? इथे धरतीमातेची आठवण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.
३) रात्रीच्या वेळी – शांतीदाता. दिवसभर काम करून आपण थकतो. आपल्याला विश्रांतीची गरज असते. मनामध्येदेखील असंख्य विचार असतात. शंका असतात. पण जगदंबा मातेचा वात्सल्यपूर्ण हात एकदा का डोक्यावर फिरला की आपोआप झोप येते. सकाळी उठल्यावर सगळा थकवा, शीण जाऊन आपण पुन्हा ताजेतवाने होतो.

ही तीन वेळा आठवण- कृतज्ञता म्हणजेच त्रिकाळसंध्या. यावेळी विविध श्लोक म्हणायचे असतात. ते फार अर्थपूर्ण आहेत. त्यांचा फक्त शब्दार्थ न पाहता, पोपटपंची न करता- त्यांचा गर्भितार्थ- भावार्थ- आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊन ही संध्या केली तर स्वतःचा जीवनविकास होतोच. शिवाय विश्‍वाची प्रगती होते. मानवतेकडे, सज्जनतेकडे वाटचाल चालू होते. विश्‍वशांती नांदते. या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत- प्रत्येकाला- स्वतःला- समाजाला- विश्‍वाला.

म्हणूनच शास्त्रीजी त्रिकालसंध्येला ‘ऍटम् बॉंब’ म्हणतात. अणू शास्त्रातला नाश करणारा बॉंब नाही तर सर्वांचे कल्याण करणारा!!
पुनरावृत्तीला अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्व आहे म्हणून तर अभ्यास करायचा असतो. संत कबीर म्हणतात-
* ‘‘करत करत अभ्यास के जडमती होत सुजाण |
रसरी आवत जात ते सिल पर परत निसान ॥
* प्रजापिता ब्रह्मकुमारी ही संस्थासुद्धा पुनरावृत्तीला फार महत्त्व देते.
– प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर (३.३० ते ५) ध्यान करायचे. त्यावेळी मी ‘आत्मा’ हा सूक्ष्म भाव मनात ठेवून आत्म्याचे विविध गुण आठवायचे- ज्ञान, पवित्रता, शांती, सुख, निर्विकारी, निरहंकारी, प्रकाशस्वरूप… तद्नंतर परमधामामध्ये असलेल्या भगवान शिवाशी योग जुळवायचा. त्याच्याकडून शक्ती घ्यायची.
* ‘मुरली’ (६.४५ ते ७.३०) सद्विचार, ध्येय, संकल्प… या विषयांवर छान असे मार्गदर्शन.
* ‘ट्रॅफिक कंट्रोल’ म्हणजे वेळोवेळी (कधी कधी एक एक तासात) चांगले भावपूर्ण, अर्थपूर्ण, ज्ञानपूर्ण गीत ऐकायचे. यामुळे प्रत्येक वेळी मनात नकारात्मक, व्यर्थ विचार येत नाहीत. त्यामुळे आत्मशख्ती वाढते. सुखशांतीचा अनुभव यायला लागतो.
हीसाधनासुद्धा शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊनच करायची असते.
* मला आठवते- बालपणात आमच्या आजी मध्ये मध्ये माळ (रुद्राक्ष/तुळशी) जपायची व मंत्रजप करायची. त्यामुळे अनेक कौटुंबिक समस्या असूनदेखील त्या शांत असत. त्या निरक्षर असल्या तरी मी त्यांना सुशिक्षित- सुसंस्कृत मानतो. याचे कारण नियमित सुंदर संस्कार व जपाच्या माध्यमातून भगवंताशी योग किंवा अनुसंधान असते.
आपण योगसाधक करतो का अशी शास्त्रपूर्ण भावपूर्ण साधना? नाहीतर आजपासून सुरुवात करुया.
( संदर्भ ः प.पू. पांडुरंगशास्त्री यांची मूर्तीपूजेतील प्रवचने.)