- डॉ. सीताकांत घाणेकर
मानवविकासासाठी दोन्ही तर्हेच्या भक्तींची नितांत आवश्यकता आहे. पण आजच्या जमान्यात आपल्यातील बहुतेकजण भावभक्तीतच अडकलो आहोत. तीदेखील कर्मकांडात्मक पूजा- आरती, फुले, उद्बत्ती, प्रसाद… त्यांत भावाचा भाग किती आहे ते प्रत्येकाने विचार करून ठरवायला हवे.
सर्व ब्रह्मांड विविधतेने भरले आहे, सृष्टी विस्तृत आहे. अनेक प्राणी, पशु, पक्षी इथे आपापले जीवन जगतात. त्यातच एक अत्यंत बुद्धिमान मानला गेलेला मनुष्य हादेखील एक प्राणीच आहे. त्या बुद्धीचा सुयोग्य वापर करून तो ब्रह्मांडातली रहस्ये उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मानवनिर्मितीपासून आजतागायत हे संशोधन अखंडित चालू आहे. त्यासाठी मानव पुष्कळ अभ्यास करतो, चिंतन करतो. उत्तरं वाटतात तेवढी सोपी नाहीत.
या अनंत विश्वाला अनेक पैलू आहेत, पण मुख्य आहेत ते म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक. दोन्ही अत्यावश्यक आहेत. भौतिक प्रगती सर्व तर्हेच्या सुखसोयी देते. आजच्या तथाकथित आधुनिक जगात मानव झपाट्याने या क्षेत्रात वाटचाल करीत आहे. पण ही प्रगती जास्त करून इंद्रियसुख देते. त्यात शारीरिक पैलूला जास्त महत्त्व आहे.
आध्यात्मिक पैलू जास्त करून आंतरिक सुखाचा जास्त विचार करतो. त्यात सुख- समाधान- शांती यावर मुख्यत्वे भर दिला जातो.
पाश्चात्त्य देश भौतिक प्रगतीला जास्त महत्त्व देतो. पौर्वात्य देश आध्यात्मिक प्रगतीकडे जास्त ओढला जातो. यात प्रमुख देश म्हणजे भारत देश होय.
तसे पाहिले तर सर्व देशांनी दोन्ही पैलूंनी प्रगती व्हायला हवी हे मानलेच आहे.
मानवाचे जास्त लक्ष भौतिकतेकडे आहे. त्यात विविध पैलू आहेत- प्रमुख विज्ञान. या क्षेत्रात तर प्रगती नेत्रदीपक झाली आहे आणि क्षणाक्षणाला होतच आहे. मानवाचे लक्ष पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. तिथे तो सर्व प्रकारचे प्रयोग करतोच पण त्याशिवाय पृथ्वीच्या पोटात – भूगर्भात काय आहे, समुद्रात काय आहे याचासुद्धा शोध घेतो.
जेव्हा मानवाने रात्री काळोखात नजर वर आकाशाकडे केली तेव्हा त्याला तिथे असंख्य रत्ने दिसली- चंद्र, तारे… त्यात प्रामुख्याने आहेत – चंद्र, मंगळ… अनेक प्रकारची याने आपल्या कुशाग्र बुद्धीने तयार करून आता तो विविध ग्रहांवर स्वारी करतो. अनेक देश यात प्रगती करतात. आपला भारतदेखील – चंद्रयान, मंगळयान तयार करून आज जगाच्या स्पर्धेत उतरला आहे.
त्याचबरोबर आणखी एक अत्यंत सूक्ष्म गोष्टींवर मानवाचे लक्ष गेले, एक वेगळे शास्त्र विकसित झाले- अणुविज्ञान. त्यामुळे त्याला विविध अशा सूक्ष्म व अतिसूक्ष्म गोष्टींचे ज्ञान झाले. कुठल्याही भौतिक वस्तूंत अणू असतात हे आपल्याला माहीत आहेच- जसे मॉलिक्यूल, ऍटम. त्यापुढे जाऊन कळले की त्यात एक केंद्रस्थान आहे – न्युक्लिअस. तसेच इुलेक्ट्रॉन (विद्युत्परमाणू), प्रोटोन (धनवीजक), न्युट्रॉन… असे अत्यंत सूक्ष्म घटक आहेत.
पूर्वी विज्ञान भौतिक वस्तुंमध्ये चैतन्य नाही असे मानत होते. पण आता अणुसंशोधनानंतर ज्ञान झाले की प्रत्येक अणूंत चैतन्य आहे. इलेक्ट्रॉन्स तर एका वर्तुळामध्ये फिरतच असतात. याचाच अर्थ विश्वात काहीसुद्धा मृत नाही.
तर अशी आहेत- नेत्रदीपक संशोधने – प्रत्येक क्षेत्रात. पण दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे एवढ्या दूरपर्यंत व एवढ्या खोलवर जाणार्या मानवाने स्वतःकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे भौतिक प्रगती करून इंद्रियसुख भरपूर मिळाले तरी मानव समाधानी झाला नाही. त्याला आंतरिक शांती मिळाली नाही.
अभिमानाची गोष्ट म्हणजे इथे भारत देशातील तत्त्ववेत्त्यांनी मानवाकडे लक्ष केंद्रीत केले. योगशास्त्रासारखे एक विज्ञान विकसित केले. त्याप्रमाणे मानवाचे पंचकोश दाखवले.
* अन्नमय (शरीर) * प्राणमय (प्राण) * मनोमय (मन)
* विज्ञानमय (बुद्धी) * आनंदमय (आत्मा)
वरील सर्व कोशांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी आध्यात्मिक पैलूचासुद्धा मानवकल्याणासाठी वापर केला.
मानवी मनाचा (बाह्य-१०%, अंतः९०%) अभ्यास करता करता त्याला आढळून आले की मानवाची चित्तएकात्मता बिघडली आहे. त्याचे मन अत्यंत चंचल झाले आहेत. त्यामुळे तो विकार व वासनांनी भरलेला आहे. त्याचा संसार, जीवन दुःखमय झाली आहेत. त्याला आंतरिक शांती मिळत नाही. त्याची आत्मशक्ती कमी झाली आहे.
अभ्यास व चिंतनानंतर आपल्या तत्त्ववेत्त्यांनी अनेक छान उपाय सुचवलेत.. त्यापैकी एक आहे- मूर्तिपूजा. अगदी शास्त्रशुद्ध. फक्त कर्मकांडात्मक नाही. अंतरंग योगामध्ये आपला हाच विचार चालू आहे.
आपल्या वैदिकांनी या विषयावर सखोल चिंतन करून ठरवले की आम्हाला सगुण- साकार मूर्ती पाहिजे. त्यांच्या दृष्टीने भगवंताला आकार आहे तरी तो सर्वव्यापक आहे. तसेच त्याच्या गुणांना ते ‘माया’ म्हणतात.
आजसुद्धा अनेक महापुरूष या संदर्भात मार्गदर्शन करतात. त्यातलेच एक आहेत पू. पांडुरंगशास्त्री आठवले. मूर्तिपूजेवर आधारित त्यांच्या प्रवचनात ते काय सांगतात, बघुया…
‘‘सर्वव्यापक भगवान मूर्तीच्या रूपात स्वीकारायचा, त्याची पूजा करायची. या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे का? ’’- अगदी सहज उत्पन्न होणारा हा प्रश्न आहे. शास्त्रीजी उत्तर शोधतात, चिंतन करतात व म्हणतात – ‘‘मूर्तीची गरज पूजेसाठी आहे. या मूर्तीद्वारेच चित्ताची एकाग्रता होणे शक्य आहे. ऋषी-मुनी-आचार्यांनी * मोक्षकारण सामग्रां भक्तिदेव गरीयसी – असे सांगितले आहे. जीवन विकासासाठी भक्तीचे महात्म्य समजावले आहे. भक्तीचे दोन पैलू आहेत- भावभक्ती व कृतीभक्ती.
* भावभक्तीत चित्ताची एकाग्रता येते.
* कृतीभक्तीत भगवंताचे किंवा भगवंतासाठी काम करणे अभिप्रेत आहे.
याबद्दल शास्त्रीजी म्हणतात की पक्षाला उडण्यासाठी जशी दोन्ही पंखांची सारखीच आवश्यकता असते तशीच मानवविकासासाठी दोन्ही तर्हेच्या भक्तींची नितांत आवश्यकता आहे. पण आजच्या जमान्यात आपल्यातील बहुतेकजण भावभक्तीतच अडकलो आहोत. तीदेखील कर्मकांडात्मक पूजा- आरती, फुले, उद्बत्ती, प्रसाद… त्यांत भावाचा भाग किती आहे ते प्रत्येकाने विचार करून ठरवायला हवे. संशोधनाचा विषय आहे.
कृतिभक्ती म्हणजे भगवंताचे काम आणि भगवंतासाठी काम करणे बहुतेकांना माहीत नाही. मग हे काम नक्की काय आहे… हे कसे कळणार?
अवश्य, हल्ली विविध संस्था असे सुंदर काम विश्वांत करतात. पण तेदेखील शास्त्रशुद्ध आहे का? ऋषींना अभिप्रेत तसे आहे? – हे प्रत्येकानेच स्वतःबद्दल बघितले पाहिजे.
आपल्यासारख्या सामान्यांसाठी मार्गदर्शक आहेत अनेक संत- जसे तुकाराम, ज्ञानेश्वर, सावतामाळी, मुक्ताबाई, बहिणाबाई, कबीर… कारण त्यातील अनेकजण आपल्यासारखे सामान्यच होते. फक्त त्यांची आध्यात्मिक पातळी जास्त होती. आपण त्यांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर आम्हाला दोन्ही भक्ती समजतील. नाहीतर आपला अहंकारच जास्त वाढण्याची दाट शक्यता आहे.
या विषयावर शास्त्रीजी सांगतात की आधी चित्ताची एकाग्रता आवश्यक आहे –
‘‘सामान्यतः अशी धारणा आहे की कोणत्याही वस्तुकडे एकटक पाहात राहणे म्हणजे चित्ताची एकाग्रता. परंतु चित्त-एकाग्रतेचा अर्थ इतका सीमित नाही. एवढ्याने जीवनविकास होणार नाही. जीवनविकासाचा खरा आधार आहे मन.
* मनः एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो
– जीवनविकास साधण्यासाठी मनावर परिणाम व्हावा लागतो. चित्ताची एकाग्रता भौतिक नाही, ती मानसिक आहे. चित्त ज्याच्यात एकाग्र करायचे, त्याचा आकार चित्ताला (मनाला) ग्रहण करावा लागतो. दुसर्या शब्दात सांगता येईल- ‘मनच त्या वस्तूचा आकार उभा करते’.
मन सर्वगुणसंपन्न अशा मूर्तीचा आकार ग्रहण करील तरच त्या मूर्तीचे गुण त्याच्यात संक्रान्त होऊ शकतील.
खरे म्हणजे ही गोष्ट समजणे सोपे आहे पण तरीदेखील ज्या व्यक्ती मनाचा अभ्यास करत नाही त्यातील काहीजण म्हणतात की-
‘‘मनुष्याकारात चित्त एकाग्र करण्याऐवजी सरळ कोणत्यातरी एका तत्त्वाचा आधार घेऊन ध्यान का करू नये? स्वतःच स्वतःला ओळखावे – असे जर असेल तर आत्मतत्त्व जाणण्यासाठी एखाद्या मूर्तीचा किंवा साकारतेचा आधार कशाला?
शास्त्रीजी म्हणतात की एखाद्या तत्त्वाचा आधार घेऊन चित्त एकाग्र करणे सामान्य माणसानाच नव्हे तर सर्वांनाच कठीण आहे.
व्यक्ती तितक्या प्रकृती – म्हणून त्या संदर्भात मते वेगवेगळी अवश्य असतील. कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य अवश्य आहे.
आपल्या योगसाधकांना काय वाटते? विचार-अभ्यास-चिंतन करुया का?
पुढच्या वेळी बघुया श्रीकृष्णभगवान या विषयावर काय सांगतात ते… (गीता अध्याय- १२- भक्तियोग) (संदर्भ – मूर्तिपूजा)