योगसाधना – २७८ योगमार्ग – राजयोग ईश्‍वर प्रणिधान – ९

0
157

– डॉ. सीताकांत घाणेकर

ईश्‍वराने जन्मतःच माणसाला दोन अनमोल गोष्टी दिलेल्या आहेत- एक श्रद्धा आणि दुसरी बुद्धी. या दोहोंचा समन्वय साधणे जीवनविकासासाठी आवश्यक आहे. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे फारच कमी व्यक्ती असा समन्वय साधू शकतात.

भगवंताने रचलेल्या विश्‍वांत प्रत्येक क्षेत्रात विविधता आहे. या विविधतेत धर्म हा विषयदेखील येतो. तसेच विविध ईश्‍वर आहेत. खरे म्हणजे महापुरुषांच्या मतानुसार धर्म एकच आहे… तो म्हणजे मानवता. ईश्‍वरसुद्धा एकच आहे. मानवाने त्याला वेगवेगळी रूपे दिलीत. कारण त्यामुळे ईश्‍वराची विविध कार्ये समजणे सोपे जाते.
भारतात ही सर्व विविधता भरपूर विस्तृत आहे. इथे आपल्या प्राचीन ऋषींच्या बुद्धीची झेप दिसते.
ईश्‍वरप्रणिधान – ईश्‍वरासमोर समर्पण – या विषयावर चिंतन करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे – की हे समर्पण प्रेम व भावपूर्वक अपेक्षित आहे. त्यामुळे ईश्‍वराबद्दल बुद्धीगम्य ज्ञान आवश्यक आहे. म्हणूनच महापुरुषांनी ईश्‍वरी रूपाबद्दल कसे सखोल अभ्यास व चिंतन केले आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. विश्‍वांत असे अनेक महापुरुष आहेत. त्यातीलच एक म्हणजे पू. पांडुरंगशास्त्री आठवले.
गणपती या शब्दाचा अर्थ आम्ही बघितला. तद्नंतर नेता व तत्त्ववेत्ता यांमध्ये कसे समाजाभिमुख गुण अभिप्रेत आहेत, हे सुद्धा बघितले. आता शास्त्रीजी पुढे काय विवरण करतात ते बघुया.
येथे गणपतीच्या वेगवेगळ्या अवयवांचा विचार करूया. हत्तीचे कान सुपासारखे मोठे असतात. आता सुपाचा गुण कोणता? – सूप फोलपटे बाहेर फेकून देते व स्वच्छ धान्यच आंत स्वतःजवळ ठेवते.
* सार सार को ग्रही लही और थोथा देही उडावे.
– यातील गर्भितार्थ बघणे आवश्यक आहे.
* बोलणे सर्वांचे सर्व ऐकावे पण त्यातले सार ग्रहण करून बाकीच्या तत्त्व नसलेल्या गोष्टी उडवून द्याव्यात.
आमच्यातील बहुतेक जण चांगल्याबरोबर वाईटही गोष्टी आत ठेवतो. त्यांचा कळत-नकळत संग्रह करतो. जीवनविकासामध्ये त्यामुळे अडथळा निर्माण होतो.
तसेच शास्त्रकार सांगतात की मोठे कान- हे उत्तम श्रवणाचे प्रतीक आहे. आपल्या ऋषींनी श्रवणाला भक्ती मानले आहे. त्यामुळे श्रवणभक्ती ही भक्तीची प्रथम पायरी आहे- श्रवणम्. त्यासाठीच भारतीय संस्कृतीत बहुश्रुत माणसाला जास्त किंमत आहे. भारतात म्हणूनच वेगवेगळ्या समारोहात विविध संप्रदाय प्रवचने, कीर्तने ठेवतात. त्या निमित्ताने विविध विचार व पैलू श्रवण करण्याची संधी मिळते. ज्ञानवृद्धी होते.
* गणपतीचे डोळे हत्तीसारखे बारीक आहेत. असे डोळे मानवी जीवनातील सूक्ष्म दृष्टीचे महत्त्व समजावतात व तशी दृष्टी राखण्याची प्रेरणा देतात. हत्तीची दृष्टी एवढी सूक्ष्म असते की जमीनीवर पडलेली सुईदेखील तो उचलू शकतो, असे म्हटले जाते. इथे मनुष्याला सुंदर सूचना आहे. आम्ही स्वतःची दृष्टी सूक्ष्म राखणे आवश्यक आहे. तसेच आमच्या जीवनात नकळत येणार्‍या सूक्ष्म दिसणार्‍या दोषांना अडवले पाहिजे. नाहीतर माणसाचं जीवन उध्वस्त होण्याची फार शक्यता असते.
तसेच हत्तीचे बारीक डोळे दीर्घदृष्टीचे प्रतीक आहे. आपल्या इथे अशी समजूत आहे की या दीर्घ दृष्टीच्या आधारे हत्ती कोणत्याही व्यक्तीचे भविष्य जाणू शकतो. बालपणात आम्हाला गोष्टीच्या द्वारे ही गोष्ट समजावत असत…
* जुन्या काळात बेवारस राजा मेला तर हत्तीणीच्या सोंडेत माळ देऊन तिला राज्यांत फिरवीत असत. ज्याच्या गळ्यांत हत्तीण माळ घालील त्याला राजा बनवत असत.
तद्नंतर दिसते हत्तीची लांब सोंड म्हणजे त्याचे नाक जे दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते. अशाच काही गोष्टी प्रचलीत आहेत, ज्यामुळे याबद्दल उत्तम बोध मिळतो.
* पूर्वी हत्ती हे राजाचे वाहन होते. ते शिकारीला जाताना हत्तीवर स्वार होऊन जात. अनेक वेळा राजाला पाहिजे त्या दिशेने हत्ती जाण्याचे नाकारत असे. तिथे काहीतरी संकटग्रस्त परिस्थिती आहे हे हत्तीला त्याच्या सोंडेमुळे कळत असे. म्हणजेच त्या रस्त्याने गेले असता सर्वांच्या जीवाला धोका होऊ शकत होता.
याचाच अर्थ माणसाजवळ पुढचे संकट जाणून घेण्याची शक्ती असायला हवी.
नेता व तत्त्ववेत्ता यांच्याकडे हे गुण असणे आवश्यक आहेत-
* कुठल्याही विषयाचे सार ग्रहण करणे, आपल्या जनतेच्या व राज्याच्या हिताच्या गोष्टी ऐकणे.
* आपल्या अनुयायांवर व राज्यांतील विविध घटनांवर बारीक नजर ठेवणे तसेच राज्याच्या प्रगतीबद्दल दूरदृष्टी ठेवणे.
* आपल्या राज्यांत व शेजारच्या राज्यांत – जास्त करून शत्रू राज्यांत काय शिजते आहे हे जाणून घेणे. येणार्‍या संकटाची जाणीव ठेवून तशी जय्यत तयारी करणे.
सर्व विश्‍वांत ज्या समस्या आहेत- राज्याराज्यातील, देशादेशातील…समस्यांबद्दल सर्व पैलूंनी परिपूर्ण असा विचार करणे ही प्रत्येक नेत्याची नैतिक जबाबदारी आहे. आहेत का असे नेते व तत्त्ववेत्ते आपल्या राज्यांत, देशात, विश्‍वांत? महाभारतात असा एक उत्कृष्ट नेता दिसतो तो म्हणजे पूर्णपुरुषोत्तम योगेश्‍वर श्रीकृष्ण. त्यावेळच्या सर्व घटनांचा अभ्यास केला तर श्रीकृष्णाची सूक्ष्म व दूरदृष्टी सहज लक्षात येते. आजच्या वैश्‍विक परिस्थितीत सर्व देशांबरोबर भारताला तरी अशा नेत्याची आत्यंतिक गरज आहे.
शास्त्रीजी पुढे गणपतीच्या दोन सूळ्यां (दात)बद्दल अत्यंत ज्ञानपूर्ण माहिती देतात.
* गणपतीचे दोन सूळे – एक पूर्ण सूळा म्हणजे श्रद्धेचे प्रतीक व अर्धा तुटलेला म्हणजे बुद्धीचे प्रतीक. जीवनविकासासाठी आत्मश्रद्धा व ईशश्रद्धा पूर्ण असायला हवी. बुद्धी थोडी कमी असली तरी चालेल. प्रभूवर व स्वतःवर थोडासा जरी कमी विश्‍वास असला तरी चालणार नाही.
या दोन गोष्टींबद्दल – श्रद्धा व बुद्धी. ते पुढे सांगतात-
* ईश्‍वराने जन्मतःच माणसाला दोन अनमोल गोष्टी दिलेल्या आहेत- एक श्रद्धा आणि दुसरी बुद्धी. या दोहोंचा समन्वय साधणे जीवनविकासासाठी आवश्यक आहे. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे फारच कमी व्यक्ती असा समन्वय साधू शकतात. बुद्धी जसजशी वाढत जाते तसतसे तिच्या प्रकर्ष अग्नीत मानवाचे श्रद्धापुष्प कोमेजून जाते.
म्हणूनच शास्त्रकार म्हणतात-
* ज्ञानियांच्या घरी भक्तीचा अभाव. (ही भक्ती म्हणजेच भाव).
स्वतःचा व विश्‍वांतील सर्व घटकांचा जीवनविकास साधायचा असेल तर श्रद्धा व बुद्धी यांचा समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मानवाने ईश्‍वराजवळ मन व हृदयातून प्रार्थना केली पाहिजे.
* हे प्रभो! तुझ्याजवळ एवढेच मागतो की आमची बुद्धी वाढली तरू भाव टिकू दे. बुद्धी म्हणजेच ज्ञान, विद्या. याबद्दल सांगताना म्हणूनच तत्त्ववेत्ते आवर्जून सांगतात-
* विद्या विनयेन शोभते.
पण असे क्वचितच बघायला मिळते. शास्त्रीजी या दोन सुळ्यांमागील तत्त्वज्ञान सांगतात…
* मानवी बुद्धी सीमित असल्यामुळे शेवटी श्रद्धेचा आसरा घेऊन पुढे जायचे असते. म्हणूनच तर त्या दोन सूळ्यांपैकी एक सूळा खंडित आहे. तो बुद्धीच्या मर्यादेचे सूचक आहे. दुसरा पूर्ण सूळा अखंड श्रद्धेचे प्रतीक आहे. बालकांना या सूळ्यांची गोष्ट सांगतात- ती म्हणजे महर्षी व्यास व गणपतीची- जी लेखणी गणपती लिहिण्यासाठी वापरत होते ती लेखणी म्हणे तुटली, पण अखंड लिहिण्याचे वचन त्यांनी व्यासाना दिले होते. त्यामुळे त्यांनी आपला सूळा तोडून त्याने लिहिणे चालू ठेवले.
मला लहानपणी गणपतीच्या बुद्धीचे व कौशल्याचे कौतुक वाटत असे. त्यामुळे इतर अनेक कारणांबरोबर गणपतीबद्दल माझे प्रेम वाढले. पण आता बुद्धीगम्य ज्ञान झाल्यावर भावाला बुद्धीची सोबत मिळाली. माझे ईश्‍वरप्रणिधान वाढले.
हीच तर गरज आहे, गोष्टी सांगण्याची व अभ्यास करण्याची.
(संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री यांच्या प्रवचनांवर आधारित ‘संस्कृती पूजन’ या पुस्तकातील – गणेश चतुर्थी)